पीएमपीएमएलच्या भाडेतत्वावरील बसचालकांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक संप पुकारला. या संपामध्ये तब्बल ६५३  बसचालक सहभागी झाले आहेत. भाडेतत्वावरील बसचे चालक संपावर गेले असले तरी पीएमपीएमएल प्रशासनाची मालकी असणाऱ्या सर्व बसेस रस्त्यावर असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. पीएमपीएलच्या बस स्थानकावर बस न थांबवणाऱ्या चालकावर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई  करण्यात येत आहे. ही दंडाची रक्कम संबधीत ठेकेदाराच्या बिलातून वसूल करण्यात आली. त्यानंतर या पुढील कारवाईची रक्कम शिस्तभंग करणाऱ्या संबधीत चालकाकडून वसूल करावी, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली आहे. त्यामुळे चालकांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. चालक संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत.

भाडेतत्त्वार चालणाऱ्या बसवरील चालक आणि ठेकेदार यांच्यामधील अंतर्गत वादामुळे सर्व सामान्य पुणेकरांना फटका बसणार आहे. या बसचे चालक बऱ्याचदा नियोजित स्थानकाच्या मागे किंवा पुढे बस थांबवतात. प्रवाशांना होणारा त्रास कमी करुन त्यांना चांगली सुविधा देण्यासाठी बस ही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाई अंतर्गत मागील १५ दिवसांत ९ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. हा दंड ठेकेदारांच्या मे च्या बिलामधून घेण्यात आला. या प्रकारानंतर नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांकडून उरलेला दंड वसूल करावा, अशी भूमिका ठेकेदारांनी घेतली. ठेकेदारांचा हा निर्णय अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ पुण्यातील चालकांनी गुरुवारी दुपारी २ वाजल्यापासून संप पुकारला. याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घेतली असल्याची माहिती पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी दिली. ते म्हणाले की, शहरातील नागरिकांचा विचार करता नेहमी प्रमाणे १२०० बस रस्त्यावर आणणार आहे. जो पर्यंत पीएमपीएमएल पूर्वपदावर येत नाही. तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.