पुण्यातील मुंढवा परिसरात शुक्रवारी रात्री पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी काही पोलीस अधिकारीच जुगार खेळताना आढळून आले. या घटनेमुळे जिल्हातील पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.

विजय जाधव असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक आहेत. त्यांच्यासह अनेकांना पोलिसांनी पकडले आहे. तर क्लब चालक माजी नगरसेवक अविनाश जाधव यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुंढवा परिसरात कपिल मॅट्रिक्स इमारतीमध्ये असणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह ४१ जणांना पोलीसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. यावेळी घटनास्थळावरून ७ लाखांची रोकड, ४ चार चाकी आणि दुचाकी वाहने, टीव्ही असा जवळपास १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगवकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.