पुणे पोलिसांकडून ‘आयबीए’ला पत्र

ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची बँक खाती गोठवावीत, असे पत्र आर्थिक गुन्हे शाखेने इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) दिले आहे. डी. एस. कुलकर्णी यांच्यााविरूद्ध दाखल असलेल्या एका गुन्ह्य़ात पोलिसांकडून अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत.

ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलकर्णी यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांकडून डी. एस. कुलकर्णी यांच्या पुणे आणि मुंबईतील निवासस्थानावर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. पोलिसांकडून तेथून काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी पुण्यात ३५१ ठेवीदारांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने कुलकर्णी यांच्या विविध बँकांमधील सत्तर खाती गोठवावीत, असे पत्र पोलिसांकडून इंडियन बँक्स असोसिएशनला देण्यात आले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

कुलकर्णी यांच्याविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्य़ाच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून भादंवि ४०९, १२० ब (कट रचणे) तसेच  प्राईज चिट अँड मनी सक्र्युलेशन बॅनिंग अ‍ॅक्ट (आमिष दाखवून फसवणूक करणे) या अतिरिक्त कलमांद्वारे कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

डीएसकेंकडून न्यायालयात जामिनासाठी अर्ज

डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याकडून अ‍ॅड. श्रीकांत शिवदे आणि अ‍ॅड. गिरीश कुलकर्णी यांच्यामार्फत विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात जामीनअर्ज सादर करण्यात आला आहे. त्यांच्या जामीनअर्जावर शनिवारी (४ नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. ‘मला कोणाला फसवायचे नाही. गुंतवणूकदारांना मी पैसे देण्यास तयार आहे. मी देश सोडून जाणार नाही. म्हणून मी पोलिसांकडे पारपत्र जमा केले आहे’, असे त्यांनी न्यायालयाकडे दिलेल्या अर्जात नमूद केले आहे.

‘ईडी’, ‘सेबी’शी पत्रव्यवहार

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी परदेशात तसेच देशातील अन्य भागात गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे सक्त वसुली संचालनालय (ईडी), सेबी तसेच कंपनी नोंदणी कार्यालय (रजिस्ट्रार ऑफ कंपनीज) या यंत्रणांशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, असे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.