पोलिसांचे विशेष पथक; एसटी संपामुळे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी वाढली
दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांच्या आवारात मोठी गर्दी असते. गर्दीत प्रवाशांकडील मौल्यवान ऐवज असलेल्या बॅग, महिलांकडील पर्स तसेच मोबाईल लांबविण्याच्या घटना घडतात. एसटी संपामुळे रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या आवारातील चोऱ्या रोखण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून खास पथक तयार करण्यात आले आहे.
पुणे स्टेशनवरून दिवसा आणि रात्री २८५ रेल्वेगाडय़ा सुटतात. पुण्यात कामानिमित्त परप्रांतीय मजूर मोठय़ा संख्येने स्थायिक झाले आहेत. दिवाळीच्या सुटीत अनेक जण पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. दिवाळी सुटीत रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशांची गर्दी होती. एसटी संपामुळे गेले दोन दिवस रेल्वेगाडय़ांना मोठी गर्दी होती. रेल्वे स्थानकाच्या आवारात भुरटय़ा चोऱ्या करणाऱ्या चोरटय़ांचा सुळसुळाट असतो. चोरटय़ांवर नजर ठेवण्यासाठी लोहमार्ग पोलिसांकडून खास पथक तयार करण्यात आले आहे. दिवसा आणि रात्री या पथकाकडून चोरटय़ांवर नजर ठेवली जाणार आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलिसांच्या पुणे स्टेशन स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हिम्मत माने-पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
रेल्वे स्थानकाच्या आवारातील फलाटावर दिवसा पंचवीस पोलीस तसेच रात्री पंधरा पोलिसांचे पथक गस्त घालणार आहे. त्याबरोबरच त्यांच्या सोबत साध्या वेशातील पोलिसांचे पथक चोरटय़ांवर नजर ठेवणार आहे. गर्दीत महिला प्रवाशांच्या पर्स पळवणे, प्रवाशांच्या बॅगांमधील मौल्यवान ऐवज लांबवणे तसेच मोबाईल लांबवण्याच्या घटना घडतात. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे गाडीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याच्याही घटना घडतात, असे त्यांनी सांगितले.
उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांना गर्दी वाढली
पुण्यात मोठय़ा संख्येने शिक्षणासाठी विद्यार्थी तसेच नोकरदार स्थायिक झाले आहेत. गेल्या दोन दिवसात उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांना प्रवाशांनी गर्दी होती. त्या तुलनेत गुरूवारी उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याचे निरीक्षण सहायक निरीक्षक हिम्मत माने-पाटील यांनी नोंदवले.
गर्दी जुन्या पुलावरच
रेल्वे स्थानकाच्या आवारात सध्या तीन पूल आहेत. त्यापैकी जुन्या पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. काही वर्षांपूर्वी बांधलेल्या नवीन दोन पुलांचा प्रवाशांकडून फारसा वापर होत नाही. या तीन पुलांव्यतिरिक्त रेल्वे स्थानक आवारात आणखी एक पूल उभारण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 20, 2017 3:03 am