वाहतुकीचा वेग, गाडय़ांच्या संख्यावाढीसाठी नियोजन

पुणे : पुणे रेल्वे स्थानकामधील रेल्वे गाडय़ांचा वाढलेला भार कमी करण्याच्या दृष्टीने स्थानकातील सर्वच फलाटांची लांबी वाढविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर तब्बल २६ डब्यांची गाडी थांबू शकेल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाडय़ांना वेग देण्याबरोबरच गाडय़ांच्या संख्यावाढीच्या दृष्टीनेही हे काम उपयुक्त ठरणार आहे.

पुणे स्थानकाची सद्य:स्थिती पाहता स्थानकामध्ये दिवसाला सुमारे २५० गाडय़ा ये-जा करतात. त्याशिवाय पुणे-लोणावळा लोकलच्याही फेऱ्यांचा समावेश आहे. स्थानकातून सुटणाऱ्या किंवा पुणेमार्गे जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा त्यात मोठय़ा प्रमाणावर आहेत. सध्या लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा पंचवीस किंवा त्या आसपास डब्यांची संख्या असणाऱ्या असतात. पुणे स्थानकातील क्रमांक एकच्या फलाटावरच अशा गाडय़ा थांबविण्याची व्यवस्था आहे. इतर पाच फलाटांची क्षमता १२ ते १९ डब्यांची आहे. त्यापेक्षा जास्त डब्यांची गाडी स्थानकात घ्यायची झाल्यास ती केवळ क्रमांक एकच्या फलाटावरच घ्यावी लागते. त्यामुळे वाहतुकीत अनेक अडचणी निर्माण होतात. फलाटांची लांबी वाढल्यास ही अडचण दूर होऊ शकणार आहे.

स्थानकावरील इतर पाच फलाटांवरही २६ डब्यांची गाडी थांबविता येईल, अशा पद्धतीने त्यांची लांबी वाढविण्यात येत आहे. दोन महिन्यांपासून त्याबाबतच्या कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. शिवाजीनगरच्या दिशेने फलाटांची लांबी वाढविण्यात येत आहे. त्यासाठी लोहमार्गाच्या रचनेतही बदल करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक बदलही मोठय़ा प्रमाणावर करावे लागणार आहेत. त्यामुळे हे काम आणखी वर्षभर चालणार आहे. याच कालावधीमध्ये चिंचवड ते पुणे स्थानकादरम्यानच्या स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे उर्वरित कामही पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि आत येणाऱ्या गाडय़ांची वाहतूक सुरळीत होणास मदत होणार आहे.

परिणाम काय?

पुणे रेल्वे स्थानकावर सध्या क्रमांक एकच्या फलाटाची क्षमता २६ डब्यांची आहे. इतर कोणत्याही फलाटावर जादा डब्यांची गाडी थांबविता येत नाही. एक क्रमांकाच्या फलाटावर एखादी गाडी उभी असल्यास आणि त्याचवेळी बाहेरून जादा डब्यांची दुसरी गाडी आल्यास तिला स्थानकापासून काही अंतरावरच थांबवून ठेवले जाते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून प्रवाशांचाही खोळंबा होतो. गाडी स्थानकात आणताना ताशी १० किलोमीटरपेक्षा अधिक वेग ठेवता येत नाही. सर्वच फलाटांची लांबी वाढल्यास कोणतीही गाडी कुठल्याही फलाटावर थांबविता येईल. त्यातून स्थानकात येण्याचा वेगही ताशी ३० किलोमीटर ठेवता येईल. परिणामी गाडय़ा वेळेत येऊन वेळेत पुढे जातील. त्याचबरोबर गाडय़ांची संख्याही वाढविता येऊ शकेल.

पुणे स्थानकातील सर्वच फलाटांची लांबी २६ डब्यांची करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाहतूक बंद न ठेवता हे काम केले जात आहे. त्याचप्रमाणे त्यात अनेत तांत्रिक गोष्टींचा समावेश असल्याने या कामासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. लांबी वाढल्यानंतर स्थानकामध्ये गाडय़ांची ये-जा वेळेत होऊ शकेल. वाहतूक सुरळीत होण्यास मदत होऊन प्रवाशांनाही त्याचा लाभ होईल.

– मनोज झंवर, पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी