‘आरटीओ’त ‘सव्‍‌र्हर डाउन’ची समस्या कायम

प्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांशी संबंधित सर्वच कामे सुमारे दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन करण्यात आली असली, तरी यंत्रणेतील तांत्रिक त्रुटींचा फटका नागरिकांना वारंवार बसतो आहे. ऑनलाइनचा केंद्रीय सव्‍‌र्हर सातत्याने मान टाकत असल्याने आरटीओतील कामे करताना नागरिकांना एकप्रकारे जाच सहन करावा लागतो. सोमवारी (३ जून) पुन्हा ‘सव्‍‌र्हर डाउन’ झाल्याने कार्यालयातील कामकाज काही काळ विस्कळीत होऊन नागरिक हैराण झाले.

आरटीओतील जवळपास सर्वच कामे सध्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात. वाहन चालविण्याच्या शिकाऊ आणि पक्क्या परवान्यासह वाहनांची नोंदणी त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या शुल्कांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागरिकांची कामे विनाअडथळा, वेगवान पद्धतीने तसेच पारदर्शकपणे व्हावीत, हा त्यामागील उद्देश असला, तरी यंत्रणेतील त्रुटींमुळे त्याचा नागरिकांनाच फटका बसत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. पारदर्शकतेच्या दृष्टीने ही यंत्रणा योग्य असली, तरी त्यातील त्रुटी दूर करण्याची मागणीही सातत्याने केली जात आहे.

सुरुवातीला ऑनलाइन यंत्रणेसाठी राज्यासाठी स्वतंत्र सव्‍‌र्हरची यंत्रणा होती. त्यानंतर ती केंद्रीय करण्यात आली. मात्र, यंत्रणेतील त्रुटी दूर होऊ शकल्या नसल्याचे वारंवार निर्माण होणाऱ्या अडथळ्यांतून स्पष्ट होते आहे. वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी किंवा इतर कामांसाठी शुल्क भरणा करताना प्रामुख्याने मोठय़ा अडचणी येतात. शुल्काचा भरणा करताना तांत्रिक त्रुटी निर्माण होता. शुल्काचा भरणा केल्याशिवाय पुढील ऑनलाइन प्रक्रिया होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्यासाठी मोठा वेळ खर्च करावा लागतो. ‘सव्‍‌र्हर डाउन’ होण्याची मुख्य अडचण सातत्याने निर्माण होते. ही समस्या निर्माण झाल्यास सर्वच कामे ठप्प होतात. सोमवारीही ‘सव्‍‌र्हर डाउन’ झाल्याने सुमारे तीन ते चार तास कामकाज विस्कळीत झाले होते.

कार्यालयीन वेळेत सव्‍‌र्हरवर मोठा भार येत असल्याने तो बंद पडतो. त्यामुळे सव्‍‌र्हरची क्षमता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. क्षमतावाढ शक्य नसल्यास प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र सव्‍‌र्हर असावा. त्याचप्रमाणे ऑनलाइन यंत्रणेतील सर्व माहिती क्लाउड यंत्रणेवर साठविण्याची आवश्यकता आहे.        – राजू घाटोळे, अध्यक्ष, राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन