करोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याने सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिके च्या उद्यान विभागाने शनिवारी घेतला. तसेच शहरातील सुरू करण्यात आलेल्या अन्य उद्यानांमध्येही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास तीही उद्याने बंद करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती. शहरात लहान-मोठी अशी २०४ उद्याने आहेत. शहरातील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक महिन्यांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याबाबत नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. राज्यातील अन्य मोठय़ा शहरांमधील उद्याने अद्यापही बंद आहेत. मात्र, महापालिकेने पहिल्या टप्प्यात ८१ उद्याने १ नोव्हेंबरपासून खुली केली होती. मात्र, उद्याने सुरू करताना दहा वर्षांखालील मुले आणि ६५ पेक्षा अधिक वय असणारे नागरिक, गर्भवती महिला, अन्य आजार या व्यक्तींना प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. हास्य क्लब, योग, दिवाळी पहाट कार्यक्रम, यांना  बंदी घालण्यात आली होती. तसेच उद्यानात येणाऱ्यांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.

मात्र, उद्याने खुली झाल्यानंतर दहा वर्षांखालील मुले, ६५ पेक्षा अधिक वय असणारे नागरिकही उद्यानांमध्ये येत असल्याचे निदर्शनास आले आहे. उद्यानांमधील व्यायामाचे साहित्यही वापरले जात असून उद्यानांमध्ये येणारे अनेक नागरिक मुखपट्टीचा वापर करत नाहीत. करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दटावणाऱ्या रखवालदारासोबत हुज्जत घालण्याचे प्रकारही सारसबागेत घडले. या सर्व पार्श्वभूमीवर१४ नोव्हेंबर पासून सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आल्याचे उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.