आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जय्यत तयारी सुरू आहे. या तयारीमध्ये भाजप आणि शिवसेना आघाडीवर असून केंद्रात, राज्यात, महापालिकांमध्ये हे पक्ष सत्तेवर आहेत. या दोन्ही पक्षात अद्यापर्यंततरी सर्वकाही ठीक सुरू असल्याचे दिसत असताना, आता पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी मंगळवारी शहराचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी गणपती बाप्पा मोरया, कसबा मतदारसंघ शिवसेनेला मिळू दे, अशी प्रार्थना त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी गणराया चरणी केली.

विशेष म्हणजे भाजपा आणि शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणत्याही मतदारसंघातील उमेदवाराची निश्चिती केलेली नसताना किंवा युतीचे जागा वाटपही झालेले नसताना पुण्यात शिवसेनेकडून भाजपाच मतदारसंघ असलेल्या कसबा येथे प्रचाराचा नारळ फोडला गेल्याने युतीबाबत राजकीय वर्तुळात जोरादार चर्चा सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणुका काही दिवसांवरच आलेल्या आहेत. या अगोदर प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना आघाडीवर असून युतीबाबत लवकरच घोषणा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून सांगितले जात आहे. याच दरम्यान दोन्ही पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात येत आहेत. या सर्व घडामोडी लक्षात घेता. ज्याप्रमाणे २०१४ मधील विधानसभा निवडणुकांप्रमाणे अखेरच्या क्षणी स्वबळावर निवडणुका लढवल्या गेल्या. त्या प्रमाणे यंदा देखील त्याचीच पुनरावृत्ती होणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून गिरीश बापट हे निवडून आले आहे. हा मतदारसंघ राज्यात भाजपचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो. तसेच, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत गिरीश बापट यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आणि प्रचंड मतांनी निवडून देखील आले. त्यानंतर गिरीश बापट यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. आता गिरीश बापट यांच्यानंतर कसबा मतदार संघातून उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे. दरम्यान भाजपकडून अनेक नेत्यांची नावं देखील पुढे येत असताना शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी गणरायाची आरती करण्यात आली आणि गणपती बाप्पा मोरया, कसबा शिवसेनेला मिळू दे अशी प्रार्थना देखील करण्यात आल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे. तर या सर्व घडामोडी लक्षात घेता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खरच युती होणार का? असा प्रश्न देखील सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह मतदारांना पडला असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे शहरातील आठही मतदारसंघात भाजपाचे आमदार असून ते निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यात आज पुण्यात शिवसेनेच्या नगरसेवकाकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्याने आगामी काळात जागा वाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आम्ही काम करत आहोत – धनवडे
या बाबत शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले की, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काम करत आहोत. या मतदारसंघात आता आमदार नसल्याने आम्ही शिवसेनेला ही जागा मिळावी. म्हणून पक्षाकडे आणि गणराया चरणी प्रार्थना करत आहोत. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख जो निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही काम करू असेही त्यांनी यावेळी म्हटले.