पूर्वमोसमी पावसाची शक्यता

पुणे : टाळेबंदीत बहुतांश नागरिक घरी असले, अत्यावश्यक सेवा किंवा काही प्रमाणातील सवलतींमुळे घराबाहेर पडाव्या लागणाऱ्या पुणेकरांना सध्या उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागतो आहे. पुणे शहर आणि परिसरातील तापमानाचा पारा सलग आठवडाभर ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविला जात आहे. रात्रीच्या तापमानातील वाढीमुळेही कमालीचा उकाडा जाणवतो आहे. सोमवारी (११ मे) संध्याकाळपर्यंत तरी पूर्वमोसमी पावसाने शहरात हुलकावणी दिली असली, तरी पावसाची शक्यता कायम आहे.

कोरडय़ा हवामानाच्या स्थितीनंतर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील कमाल आणि किमान तापमानात वाढ सुरू झाली होती. एप्रिलच्या मध्यानंतर काही प्रमाणात तापमानवाढ झाली असली, तरी १६ एप्रिलचा एकच दिवसाचा अपवाद वगळता शहरातील दिवसाचे तापमान चाळिशीपार गेले नव्हते. एप्रिलमध्ये बहुतांश वेळेला ढगाळ वातावारणाची स्थिती होती. त्यामुळे दिवसाच्या तापमानात फारशी वाढ झाली नसली, तरी रात्रीच्या तापमान वाढीने उकाडा मोठय़ा प्रमाणात वाढला होता.

मे महिन्याच्या सुरुवातीपासून शहरातील तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदविले जात होते. मात्र, ५ मे नंतर तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपुढे गेला. त्यानंतर तापमानाचा पारा कमी-अधिक होत असला, तरी तो अद्यापही ४० अंशांच्या खाली आलेला नाही. या दरम्यान ९ मे रोजी शहरात या हंगामातील उच्चांकी ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी (११ मे) शहरात ४०.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २ अंशांहून अधिक आहे. दिवसाचे कमाल तापमान वाढत असताना रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने या कालावधीत कमालीचा उकाडा जाणवतो आहे. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना उन्हाचा चटका, तर घरात असलेल्या नागरिकांना उकाडा सहन करावा लागतो आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहर आणि परिसरात १० आणि ११ मे रोजी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. जिल्ह्यातील काही भाग वगळता पाऊस झाला नाही. शहरात दोन दिवस दुपारनंतर ढगाळ स्थिती होती. मात्र, अद्यापही शहर आणि परिसरात पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम आहे.

पुण्याचे तापमान

(अंश सेल्सिअस)

दिनांक  कमाल  किमान

५ मे       ४०.३   १९.५

६ मे       ४०.४   २४.३

७ मे       ४०.१   २०.३

८ मे       ४०.१   २२.८

९ मे       ४०.६   २२.७

१० मे     ४०.५   २३.५

११ मे     ४०.३   २२.७