शहरात २४ जानेवारीनंतर निरभ्र आकाशाची स्थिती

पुणे : पुणे शहर आणि परिसरात सध्या आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ असल्याने तापमानात-चढ उतार होत आहेत. किमान तापमान वाढल्याने थंडी कमी झाली आहे. मात्र, २४ जानेवारीपासून आकाश निरभ्र होणार असल्याने तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन पुन्हा कडाक्याची थंडी अवतरणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात अद्यापही बहुतांश भागात थंडी कायम आहे. विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या खाली आहे.

शहरात १४ जानेवारीपासून कोरडे हवामान निर्माण झाले होते. त्याच वेळी उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढले होते. परिणामी राज्यात आणि शहरातील किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट होऊन कडाक्याची थंडी पडली होती. १७ जानेवारीला शहरात यंदाच्या हंगामातील नीचांकी ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दोन दिवस तापमानाचा पारा १० अंशांखाली राहिला.  त्याचप्रमाणे दिवसाच्या तापमानातही मोठी घट झाल्याने दिवसा थंड वारे जाणवत होते. या कालावधीत बोचऱ्या वाऱ्यांमुळे पुणेकरांनी हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा अनुभव घेतला. मात्र, दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी शहरात रात्रीचे किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. दिवसाच्या तापमानाचा पारा ३१.४ अंशांवर राहिल्याने दुपारी काही प्रमाणात ऊन जाणवत होते.

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, २१ ते २३ जानेवारी या कालावधीत शहरात आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत किमान तापमान १४ ते १५ अंशांपर्यंत जाऊन थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. २४ ते २६ जानेवारी या कालावधीत आकाश पुन्हा निरभ्र होणार आहे. परिणामी २४ जानेवारीपासून किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. या कालावधीत किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस या नीचांकी पातळीवर जाण्याची शक्यता असल्याने पुन्हा कडाक्याची थंडी अनुभवता येणार असल्याची चिन्हे आहेत.