३४ हजार चालकांविरुद्ध खटले; आठ महिन्यांत ७८ लाखांचा दंड वसूल

बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमऱ्यांद्वारे लक्ष ठेवत वाहतूक पोलिसांकडून एप्रिल महिन्यापासून कारवाई करण्यास सुरुवात झाली असून शहरातील प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमऱ्यांची नजर वाहनचालकांवर असते. मात्र, शेकडो वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास धुडकावले जात असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ऑगस्ट महिना अखेपर्यंत वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या ३४ हजार वाहनचालकांविरुद्ध खटले दाखल करून त्यांच्याकडून तब्बल ७८ लाख ९१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असला तरी वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस उभे असतात. वाहतूक पोलिसांची संख्या पाहता प्रत्येक चौकात पोलीस नेमणे कठीण आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दीड वर्षांपूर्वी १२४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. हे कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यापासून बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून वाहतुकीचा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनाच्या पाटीवरून त्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक शोधून काढण्यात येतो. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला संदेश पाठविण्यात येतो. त्याने केलेला नियमभंग तसेच दंडाची रक्कम मोबाइलवर कळवली येते. ही रक्कम नजीकच्या वाहतूक शाखेत किंवा चौकात थांबलेल्या पोलिसाकडे असलेल्या ई-चलन यंत्रावर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात नियमभंग होणार नाही, याची काळजी वाहनचालकांकडून घेण्यात आली. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती झाली. वाहनचालकांकडून सर्रास नियम धुडकावले जात असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: गर्दीच्या चौकात सिग्नल तोडून गाडी दामटणे, मोबाइलवर संभाषण करणे, पादचारी मार्गावर (झेब्रा क्रॉसिंग) वाहन थांबवणे असे प्रकार सर्वत्र दिसतात. प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असूनही वाहनचालकांकडून नियम सर्रास धुडकावले जातात, असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. पादचारी मार्गावर वाहन उभे करणे, सिग्नल मोडणे, ट्रिपलसीट जाणे, विरुद्ध दिशेने वाहन नेणे अशा प्रकारचे नियमभंग सर्रास वाहनचालकांकडून करण्यात येतात. पुणेकरांबरोबरच शहरात शिक्षणासाठी आलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांकडूनही वाहतुकीचे नियम मोडले जातात.

नियमांचे उल्लंघन

* सिग्नल तोडणे

*  वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणे

*  झेब्रा क्रॉसिंगवर वाहन थांबवणे

*  विरूद्ध दिशेने वाहन नेणे

* दुचाकीवर तिघे जण बसणे