एका परीक्षेला विलंब, एक परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ

पुणे : गेल्या सहा महिन्यांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींसह सुरू झाल्या. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने होत असलेल्या परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रकावर परिणाम झाला. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा नियोजित वेळेपेक्षा उशिरा घ्याव्या लागल्या, तर एक परीक्षा पुढे ढकलून १७ ऑक्टोबरला घेण्याची वेळ विद्यापीठावर आली.

दरवर्षी मार्च ते जून दरम्यान होणाऱ्या अंतिम वर्षांच्या परीक्षांवर करोना संसर्गाचा परिणाम झाला. संसर्गाच्या काळात परीक्षा घेण्याचा प्रश्न निर्माण झाला. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्षांच्या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जात आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षांच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन परीक्षेतील विज्ञान पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील संगणकीय बीजगणिताच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्न न दिसता के वळ उत्तराचे पर्याय दिसत होते. जवळपास वीसहून अधिक प्रश्नांबाबतीत असा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. तर ऑफलाइन परीक्षेसाठी विद्यापीठाकडून पाठवण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका टंकाच्या (फॉन्ट) अडचणींमुळे वाचता येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे ही अडचण दूर करून परीक्षा घेण्यासाठी या विषयाची परीक्षा विलंबाने घेण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला. त्यामुळे एक ते दोन आणि चार ते पाच या वेळेत संबंधित विषयाची परीक्षा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर दोन ते चार तास वाट पाहावी लागली. या अडचणी वगळता परीक्षा सुरळीत सुरू झाली.

 

ऑफलाइनच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा

ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा के ंद्रावर जाऊन ऐनवेळी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यासाठीची आवश्यक कार्यवाही केली.

पाच हजारांहून अधिक कॉल

विद्यापीठाने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन तयार केली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पाच हजारांहून अधिक कॉल आले. विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आलेल्या अडचणी हेल्पलाइनच्या माध्यमातून दूर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

परीक्षेकडे पाठ

परीक्षेच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन परीक्षेसाठी २९ हजार २३६ विद्यार्थी अपेक्षित होते. प्रत्यक्षात १७ हजार ११८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली, तर १ हजार ८११ विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिली. त्यामुळे दहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली.

परीक्षेच्या पहिल्या दिवशी ऑनलाइन परीक्षा सुरळीत झाली. ऑनलाइन परीक्षेत बीजगणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक अडचण आल्याने त्या विषयाची परीक्षा १७ ऑक्टोबरला घेतली जाईल. तर ऑफलाइन परीक्षेत युनिकोड फॉन्टची तांत्रिक अडचण आली. त्याबाबतची आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात आली. मात्र त्यामुळे ती परीक्षा विलंबाने घ्यावी लागली. कमी वेळात अनेक विषयांचे परीक्षा घेण्याचे आव्हान असल्याने प्रश्नपत्रिका तयार करताना काही त्रुटी राहून गेल्या असू शकतात. मात्र सर्व त्रुटी, तांत्रिक अडचणी दूर करून परीक्षा व्यवस्थित पार पडतील.

– महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

पहिल्या दिवशीच्या परीक्षांत आलेल्या दोन तांत्रिक अडचणी वगळता कोणतीही समस्या, तक्रार आली नाही. ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा व्यवस्थित झाल्या. पुढील परीक्षाही कोणत्याही अडचणींविना पार पडतील असा विश्वास आहे.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू