ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली असून विजयी उमेदवारांचे जल्लोषाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यात पुण्यामध्ये एका पत्नीने आपल्या पतीची काढलेली मिरवणूक सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतेय. कारण,ग्रामपंचायतीत पती निवडून आल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी पत्नीने चक्क पतीलाच खांद्यावर घेत मिरवणूक काढली. त्यामुळे या मिरवणूकीची आणि पती-पत्नीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

संतोष शंकर गुरव असं विजयी उमेदवाराचं नाव असून रेणुका संतोष गुरव असं पत्नीचं नाव आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील पाळू ग्रामपंचायतीत जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागांवर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोठा वाटा होता. त्यामुळे पती विजयी झाल्याचं समजताच पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी थेट पतीला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.

महाराष्ट्रातील चांदयापासून बांदयापर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या आहेत. अनेकांना कित्येक वर्षाची सत्ता गमवावी लागली तर अनेक नवीन पॅनलनी विजय मिळवला आहे. निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला असून अनेकांनी विजयानंतर जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. अनेकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर हिट ठरत आहेत.  नेहमी घरातील इतर व्यक्ती किंवा मित्रमंडळी विजयी सदस्याला खांद्यावर घेऊन मिरवताना दिसतात. मात्र, पहिल्यांदाच पत्नीने पतीला खांद्यावर बसवून मिरवणूक काढल्याचं पाहायला मिळाल्याने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बघा व्हिडिओ

व्हायरल झालेल्या या व्हिडिओची चर्चा सध्या अवघ्या महाराष्ट्रात आहे.