पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांना बढती मिळाली असून त्यांनी आज पुणेकरांचा निरोप घेतला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुणेकरांचे आभार मानले. तसेच पुणेकरांच्या स्वभावावर बोट ठेवत पुणेकरांनी मला ऱ्हस्व, दीर्घ शिकवलं, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. मागील दोन वर्षाच्या काळातील आपल्या कामगिरीचा आढावा यावेळी त्यांनी मांडला.

व्यंकटेशम म्हणाले, “पुणे शहर पोलीस दलात काम करताना गेल्या दोन वर्षात अनेक अनुभव आले. प्रामुख्याने पुणे पोलिसांचे ट्विटर हँडल नेहमीच चर्चेत राहिले. आम्ही सुरुवातीला ट्विट करत होतो, तेव्हा वाक्य रचनेमध्ये ऱ्हस्व, दीर्घच्या चुका होत होत्या. या चुका पुणेकर आवर्जून लक्षात आणून देत होते. त्यामुळे कालांतराने एखादं ट्विट करण्याआधी त्यातील वाक्य रचनेमधील ऱ्हस्व-दीर्घ बरोबर आहे की नाही ते पाहूनच पोस्ट करण्यास सुरुवात केली. यामुळे पुणेकरांनी मला ऱ्हस्व, दीर्घ शिकवलं.”

गेल्या सात महिन्यांपासून आपण करोना आजाराचा सामना करीत आहोत. दरम्यान, यासाठीच्या प्रत्येक आवाहनाला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी कायम पुणेकरांचा ऋणी राहिल असेही के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले.

व्यंकटेशम यांची महाराष्ट्र राज्याच्या विशेष अभियान प्रमुखपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.