केंद्राच्या मार्गदर्शक सूचनाच नाहीत

पुणे : साक्षरता वाढवण्यासाठीच्या कार्यक्रमाला सध्या राज्यात खीळ बसली आहे. साक्षर भारत या अभियानाची मुदत संपल्यानंतर पुढील टप्प्यातील नवे अभियान सुरू करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाकडून राज्य शासनाला न आल्याने नव्या अभियानाबाबत अद्याप प्रश्नचिन्हच आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५० टक्कय़ांहून कमी असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्य़ांमध्ये साक्षर भारत अभियान राबवण्यात आले. महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदुरबार, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना आणि गोंदिया या दहा जिल्ह्य़ांमध्ये हे अभियान राबवून प्रेरकांच्या माध्यमातून निरक्षरांना साक्षरतेचे धडे देण्यात आले.

राज्य सरकारच्या अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण विभागाच्या माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली. मार्च २०१८ मध्ये या अभियानाची मुदत संपली. त्यानंतर ‘पढम्ना लिख़ना’ हे नवे अभियान केंद्र शासनाकडून राबवण्यात येणार होते. मात्र, अद्याप त्या बाबत काहीच स्पष्टता आलेली नाही. दरम्यानच्या काळात अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण विभागाने दहा जिल्ह्य़ांतील साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झाली का, याची तपासणी केली. त्यात काही जिल्ह्य़ांत साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले होते. या दहा जिल्ह्य़ांमध्ये मिळून ९.६ टक्के साक्षरतावृद्धी झाली होती.

‘केंद्र शासनाकडून ‘पढम्ना लिख़ना’ हे नवे अभियान राबवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे येणे अपेक्षित होते. आधी जुलै २०१८ पर्यंत ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर होणे अपेक्षित होते.

त्यानंतर मार्च २०१९ पर्यंत मार्गदर्शक तत्त्वे मिळतील, असे सांगण्यात आले होते. अद्यापर्यंत ही मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आलेली नाहीत.

दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुका आल्याने केंद्राच्या पातळीवर या विषयासंदर्भात निर्णय झाला की नाही याची कल्पना नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत साक्षरता वृद्धीच्या संदर्भातील पुढील टप्पा सुरू होऊ शकलेला नाही. मात्र, येत्या काळात या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे,’ अशी माहिती शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.