तेरा रुपयांत म्हशीचे एक लिटर दूध आणि अकरा रुपयांत गाईचे दूध मिळेल, अशी जाहिरात करणाऱ्या ‘श्रीराज दूध’ च्या साताऱ्यातील कार्यालयावर अन्न व औषध विभागाने (एफडीए) छापा टाकला असून तेथून दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
या दुधाची जाहिरात वाचून शंका आल्याने ‘क्रिएटिव्ह फाउंडेशन’चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी एफडीएचे आयुक्त डॉ. महेश झगडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार एफडीएने हा छापा टाकला आहे. त्यात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारा घटक (डीमिनरलाइज्ड) जप्त करण्यात आला.
या घटकाच्या वापरामुळे दुधातील नैसर्गिक प्रथिनांचे प्रमाणावर परिणाम होत असल्याचे एफडीएने म्हटले आहे. कंपनीत साठविलेले टोण्ड दूध नष्ट करून तेथील दुधाचे व या घटकाचे नमुने एफडीएतर्फे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.