पुणे : कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला असून, पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १६ फेब्रुवारीपासून राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह सध्या पूर्णपणे थांबले आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी गारवा घटला आहे. गेल्या आठवड्यात थंडीचे प्रमाण अधिक असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यातही सध्या रात्रीचे किमान तापमान सरासरीपुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातही सर्वत्र तापमान सरासरीपुढे गेले आहे. केवळ पुणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील नीचांकी किमान तापमानाची नोंद होत आहे. कोकण विभागात मुंबईचे तापमान सरासरीपुढे असून, रत्नागिरी आणि अलिबागमध्ये अद्यापही तापमानाचा पारा सरासरीखाली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारपर्यंत राज्यात सर्वच कोरड्या हवामानाची स्थिती राहणार आहे. १६ फेब्रुवारीला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाला सुरुवात होईल. १७ फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पाऊस होईल. या तीनही विभागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १८ फेब्रुवारीलाही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी असेल. कोकण विभागात १७ आणि १८ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या कालावधीत रात्रीच्या किमान तापमानात आणखी वाढीची शक्यता आहे.

बदल कशामुळे?

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून हळूहळू उष्ण वारे, बाष्प येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. केरळ किनारपट्टी लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याची तीव्रता वाढून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक असेल. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 मुंबईत किमान तापमानात घट

मुंबईत गेल्या आठवड्यात एकाच दिवसात तापमानात चार ते पाच अंशाने वाढ-घट नोंदविली जात होती. तुलनेने गेल्या तीन दिवसांत मोठे बदल झाले नाहीत. मुंबईत सोमवारी किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.