दिवाळी साहित्याच्या रस्त्यालगतच्या विक्रीला फटका

पुणे शहर आणि पिंपरी- चिंचवड परिसरात दिवाळीचा दुसरा दिवसही पावसाचा ठरला. रविवारी रात्री शहराला पावसाने झोडपून काढल्यानंतर सोमवारीही दुपारी काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची त्यामुळे तारांबळ उडाली. दिवाळी साहित्याच्या रस्त्यालगतच्या विक्रेत्यांना या पावसाचा फटका बसला. आणखी एक- दोन दिवस शहरात आकाश ढगाळ राहणार असून, मंगळवारीही काही भागात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक स्थिती आहे. त्यातूनत मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. दिवाळीच्या तोंडावर पाऊस पडणार असल्याची शक्यता यापूर्वीच हवामान विभागाने व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. सोमवारीही पावसाचा अंदाज होता. त्यानुसार सकाळपासूनच आकाश अंशत: ढगाळ झाले होते. दुपारी बाराच्या सुमारास अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सुमारे चाळीस मिनिटे बरसलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात आणि जिल्ह्यतही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. दिवाळीच्या साहित्याने सध्या बाजारपेठा फुलल्या आहेत. पावसामुळे काही रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याने रस्त्यालगत दिवाळी साहित्याची विक्री करणाऱ्यांना त्याचा फटका बसला. काहींचे साहित्य पावसात भिजले.

पिंपरीतही जोरदार पाऊस

मागील काही दिवसांपासून वातावरणात जाणवत असलेला उष्मा आणि दिवसभर आभाळ भरून आलेले असताना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही दिवसांपासून शहरात उष्मा जाणवतो आहे. सोमवारी सकाळपासून कधी आभाळ भरून येत होते, तर कधी लखलखीत उजेड पडत होता. चारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी आल्या. जवळपास २० मिनिटे पाऊस पडत होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. काही वेळातच लगेचच ऊन पडले. काही वेळानंतर पुन्हा आभाळ भरून आले. उशिरापर्यंत हा खेळ सुरूच होता.