चार तास धुमाकूळ; नागरिकांमध्ये घबराट
भोसरीत सुरू असलेल्या ‘रॅम्बो सर्कशी’तील हत्तीला आंघोळीसाठी मोकळ्या मैदानात आणले असता, तो अचानक बिथरला. उडय़ा मारू लागला आणि इकडे-तिकडे सुसाट पळू लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. जवळपास साडेतीन ते चार तास हत्तीचा धुमाकूळ सुरू होता. अखेर, माहुतासह सर्कशीतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आल्याने हत्ती नियंत्रणात आला आणि सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.
फोटो गॅलरी » भोसरीत सर्कशीतील हत्तीचा धुमाकूळ
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाटय़गृहाशेजारील मोकळ्या मैदानात काही दिवसांपासून ‘रॅम्बो सर्कस’ सुरू आहे. या परिसरात मोठी रहदारी असते. या भागात बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे गर्दी होती. साडेदहा वाजता या हत्तीला आंघोळीसाठी बाहेर काढण्यात आले. सर्वप्रथम तो पायाच्या जोरजोरात हालचाली करू लागला. त्यानंतर जागेवरच उडय़ा मारू लागला. थोडय़ाच वेळात तो इकडे-तिकडे पळू लागला. नंतर त्याचा पळण्याचा वेग वाढला. तेव्हा आजूबाजूच्या नागरिकांना धडकीच भरली. रस्त्यावरील पथारीवाले, विक्रेते तसेच नागरिक पळापळ करू लागले. हत्ती मागे व नागरिक पुढे पळत असल्याचे चित्र दिसत होते. नंतर हत्ती मैदानातून रस्ता ओलांडून उड्डाणपुलाखाली असलेल्या जागेत गेला. हत्ती पिसाळला, अशी वार्ता गावभर पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली. उड्डाणपुलावरून जाणारे वाहनस्वारही थांबून हा गोंधळ पाहात होते. काही वेळाने पोलीसही आले. हा गोंधळ साडेतीन ते चार तास सुरू होता. अखेर, सर्कशीतील कर्मचारी, पोलीस आदींच्या मदतीने हत्तीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या सगळ्या गोंधळात कोणतीही हानी झाली नाही.
हत्ती पिसाळला नव्हता. तसे झाले असते तर त्याने बरेच नुकसान केले असते. आंघोळीला आणल्यानंतर त्याच्या पायाला मुंग्या आल्या असाव्यात. त्यामुळे तो उडय़ा मारू लागला. ते पाहून नागरिकांमध्ये घबराट पसरली. त्यांची पळापळ पाहून तो बिथरला.
– विभीषण वाघमारे, सर्कसचे व्यवस्थापक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2016 2:53 am