सरासरीपेक्षा ६० मि. मी. पाऊस अधिक

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे दाखल होऊनही दमदार पाऊस बरसत नसल्याने चिंता व्यक्त होत असतानाच गेल्या काही दिवसांत राज्यासह शहरातही त्याने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उणा ठरत असलेला शहरातील पावसाचा आकडा आता अधिक झाला आहे. शहरातील पावसाने जून महिन्यातील सरासरी ओलांडली असून, सरासरीच्या तुलनेत सुमारे ६० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. पुढील आठवडाभर शहरात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.

शहरात यंदाचा उन्हाळा अतितीव्र ठरला. गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांतील तापमानाचा विक्रम नोंदवित कमाल तापमान यंदा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तीव्र उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठय़ा प्रमाणावर झाले. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रवासात यंदा विविध अडथळे आले. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने मोसमी वाऱ्यांच्या प्रवासात सर्वाधिक अडथळा आणल्याने त्यांचा प्रवास तब्बल दोन आठवडे विलंबाने झाला. मोसमी पावसापूर्वी होणारा पाऊस चांगला होईल, अशी आशा असताना या पावसाने हुलकावणी दिली. जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोसळलेल्या पूर्वमोसमी पावसाची स्थिती पाहिल्यास ती सरासरीच्या तुलनेत निराशाजनक  होती. शहरात ९ जून वगळता २३ जूनपर्यंत एकदाही दमदार पाऊस झाला नाही. धरण क्षेत्रातही याच कालावधीत काहीसा पाऊस झाला. शहरातील पाऊस सरासरीच्या तुलनेत तब्बल ६० मि.मी.ने मागे पडला होता. मोसमी वारे दाखल झाल्यानंतरही पावसाचा जोर नव्हता. त्यामुळे मोसमी पाऊस सरासरी भरून काढणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, २६ आणि २७ तारखेला मोसमी पाऊस जोरदार बरसला. या दोनच दिवसांमध्ये १०० मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. त्यामुळे सरासरीचे आकडे झपाटय़ाने बदलले. १ जूनपासून २५ जूनपर्यंत पुण्याचा पाऊस सरासरीत मागे पडला होता. मात्र, ३० जूनपर्यंत स्थिती बदलली.

पावसाची स्थिती कशी राहणार?

शहर आणि परिसरामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मोसमी सरी बरसत आहेत. सोमवारीही (१ जुलै) शहराच्या बहुतांश भागात हलक्या सरी कोसळल्या. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, आणखी दोन दिवस शहर आणि परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. त्यानंतर ७ जुलैपर्यंत हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत राहणार आहेत. त्यामुळे शहरात कमी-अधिक प्रमाणात आठवडाभर पाऊस राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.