छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला ढोल ताशाची मोठी परंपरा लाभली आहे. त्यामुळे ढोल ताशा पथक वाजवणारे जेवढ्या जोराने ढोल बडवत असतात. तेवढ्याच जोराने महाराष्ट्रावर संकट आणणाऱ्यांना बडवा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्वराज ढोल ताशा पथकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री गिरीश बापट आणि राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवसाम्राज्य ढोल ताशा पथकाने पटकावला. एक लाख आणि स्मृतीचिन्ह देऊन या पथकाला गौरवण्यात आले.

राज ठाकरे म्हणाले की, ढोल ताशांची परंपरा मोठी असून या परंपरेला महत्व प्राप्त करून देण्यात संगीतकार अजय-अतुल यांचे मोठे योगदान आहे.

पासपोर्टवर आजही नाव स्वरराज

माझ्या वडिलांनी माझे पाळण्यातील नाव स्वरराज असेच ठेवले होते. ते संगीतकार असल्याने त्यांना वाटले असेल की हा संगीत क्षेत्रात काही तरी करेल. मात्र मला संगीताचे राग येण्याऐवजी भलतेच राग येऊ लागले. त्याच दरम्यान मी व्यंगचित्र काढू लागलो. सुरुवातीच्या काळात माझे व्यंगचित्र हे ‘स्वरराज’ नावाने प्रसिद्ध होऊ लागले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की माझी सुरुवातीची व्यंगचित्रे ही ‘बाळ ठाकरे’ नावाने प्रसिद्ध झाली. तसे तू तुझे व्यंगचित्र हे ‘राज ठाकरे’ या नावाने प्रसिद्ध कर. बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी राज ठाकरे या नावाने व्यगंचित्र काढू लागलो. पासपोर्टवर आजही माझे नाव स्वरराज असेच आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीत गिरीश बापटांचा हात नाही

पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी बंदची हाक दिली आहे. त्याला सर्व राजकीय पक्षांनी साथ दिली आहे. त्याचा संदर्भ देत आणि व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पाहत ते म्हणाले की, इंधन दरवाढ विरोधात उद्या भारत बंद आहे. मात्र  इंधन दर वाढवण्यात गिरीष बापट याचा हात नाही हे देखील मला माहीत आहे, असे म्हणताच एकच हशा पिकला.