जात, धर्म, प्रांत, लिंग याला कडाडून विरोध करीत माणूस म्हणून श्वास घेतो आणि माणूस म्हणूनच लेखन करीत आहे. मात्र, माणसांच्या जगात माणूसपणाचं बोलणाऱ्यालाच समाजातून टाळले आणि वगळले जात आहे, अशी खंत प्रसिद्ध कादंबरीकार राजन खान यांनी शनिवारी व्यक्त केली. गुन्हेगार, राजकारणी आणि नट-नटय़ा यांच्या जमान्यात साहित्याचे स्थान गौण झाले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अमेरिकेतील डॉ. लाभसेटवार प्रतिष्ठान आणि नागपूर येथील डॉ. अनंत व लता लाभसेटवार न्यास यांच्यातर्फे संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते राजन खान यांना डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. अनंत लाभसेटवार यांच्या ‘अमेरिकेतील झोके’ या पुस्तकाचे प्रकाशनही मोरे यांच्या हस्ते झाले. पुरस्कार निवड समितीचे प्राचार्य सुनीलकुमार लवटे आणि अनिल मेहता या प्रसंगी व्यासपीठावर होते.
राजन खान म्हणाले, लेखक हा कुठल्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा, लिंगाचा नसावा अशी भूमिका घेतल्यामुळेच मी साहित्यसृष्टीत बदनाम झालो. मानव हेच वास्तव स्वीकारून जाती-धर्माला कडाडून विरोध केला. पण, विरोध म्हणजे वैर नाही हीच माझी धारणा आहे. अशा पद्धतीने काम करणारा एकांडा शिलेदार असतोतेव्हा असे पुरस्कार माझ्या लेखनाची उमेद वाढवितात.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, राजन खान हे साहित्याच्या कोणत्याही संप्रदायामध्ये नाहीत. तसेच ते कोणत्याही कंपूशाहीमध्येही नाहीत. एकाच वेळी सर्वाना लागू पडेल असे आणि त्याचवेळी प्रत्येकाचे वेगळेपण अधोरेखित करण्ययाची सिद्धी त्यांच्या लेखनात जाणवते. पूर्वी कोणी कोणावर अन्याय केले याचे हिशेब मांडून वर्तन केले तर माणसांमध्ये सख्य निर्माण होणारच नाही. हे सख्य व्हावे हेच राजन खान यांच्या लेखनाचे प्रयोजन आहे. या वेळी लाभसेटवार, सुदेश हिंगलासपूरकर आणि सुनीलकुमार लवटे यांनी मनोगत व्यक्त केले.