गाजर हलव्यासाठी मागणी; दर तेजीत

पुणे : रंगाने गडद लाल आणि चवीला गोड असणाऱ्या राजस्थानातील गाजरांचा हंगाम सुरू झाला आहे. मिठाई विक्रेते तसेच गृहिणींकडून गाजर हलव्यासाठी मागणी वाढल्याने गाजराचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात एक किलो गाजरांची विक्री ७० ते ८० रुपये या भावाने होत आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात राजस्थानातून दररोज ५ ते ८ ट्रक गाजरांची आवक होत आहे. राजस्थानी गाजर लाल, पाणीदार आणि गोड असल्याने हलवा तयार करण्यासाठी मिठाई विक्रेते तसेच गृहिणींकडून या गाजरांना चांगली मागणी असते.

दरवर्षी नोव्हेंबरमध्ये राजस्थानी गाजराचा हंगाम सुरू होतो. घाऊक बाजारात दहा किलो गाजरांना ५०० ते ५५० रुपये असा भाव मिळत आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटनेचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

मार्केटयार्डातून गोवा, सांगली, कोल्हापूर येथे गाजर विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. थंडी सुरू झाली की राजस्थानी गाजरे बाजारात विक्रीसाठी येतात. सध्या बाजारात दाखल होत असलेल्या राजस्थानी गाजरांची प्रतवारी चांगली आहे. येत्या काही दिवसात गाजरांची आवक वाढून भाव कमी होतील. राजस्थानी गाजरांचा हंगाम मार्च- एप्रिल पर्यंत सुरू  राहतो. राज्यातील तसेच मध्यप्रदेशातील गाजरे वर्षभर विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, ही गाजरे थोडी तुरट असतात. त्यातुलनेत राजस्थानी गाजर दिसायला आकर्षक असते,तसेच चवीला गोडसर असल्याने या गाजरांना चांगली मागणी असते, असेही त्यांनी सांगितले.