News Flash

तांत्रिक कारणांमुळे कर्जमाफी देण्यास विलंब

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची कबुली

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे. (संग्रहीत छायाचित्र)

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची कबुली

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात तांत्रिक कारणांमुळे विलंब झाल्याची स्पष्ट कबुली भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे दिली. कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले होते. मात्र अर्ज आणि बँकांकडील याद्या यात तफावत आहे. येत्या महिन्याभरात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटनात्मक बैठकीच्या निमित्ताने दानवे पुण्यात आले होते. त्यानिमित्ताने दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कर्जमाफीच्या मुद्दय़ाबरोबरच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नारायण राणे यांचा मंत्रिमंडळातील समावेश, भाजप नेते नाना पटोले यांची वादग्रस्त विधाने यावर भाष्य करतानाच धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले.

‘ राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले होते. हे अर्ज आणि बँकांच्या याद्या यात तफावत आढळून आली. बँकांच्या याद्यांमध्ये अनुत्पादित (एनपीए) कर्जधारकांचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या या अर्जाची छाननी सुरु आहे. याद्या दुरुस्तीची ही प्रक्रिया काही दिवसात पूर्ण होईल. त्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. तत्कालीन आघाडी सरकारने सात हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली होती. त्या सरकारने बँकांनी पाठविलेल्या यादीप्रमाणे पैसेही पाठविले होते. मात्र त्यापैकी कोणाची कर्जे माफ झाली, त्याच्या याद्या बँकांकडून जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या सरकारने शेतऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेतले,’ असे दानवे यांनी नमूद केले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आलेले नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना दानवे म्हणाले, की पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय न करता नव्याना संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. पक्षात येणाऱ्यांना आम्ही मंत्रीपदाची स्वप्ने दाखविलेली नाहीत. नारायण राणे हे एनडीएचे घटक झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना मंत्रिपद देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच संपावर जात आहेत. त्यामुळे आता सरकारला संपावर पाठविण्याची वेळ आली आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यावर पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मुंडे यांची धडपड सुरु आहे, असे दानवे म्हणाले.

सिन्हांबाबत बोलणार नाही, पटोलेंवर तूर्त कारवाई नाही

भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि खासदार नाना पटोले यांनी पक्षाच्या ध्येयधोरणावर पुण्यातील एका कार्यक्रमात जोरदार टीका केली होती. यासंदर्भात रावसाहेब दानवे यांना विचारले असता,‘ सिन्हा हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाबाबत मी बोलणार नाही. मात्र पटोले यांनी पक्षावर केलेले आरोप  गंभीर आहेत. त्याची दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल. तूर्तास कोणावरही कारवाई केली जाणार नाही,’ असे दानवे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 3:03 am

Web Title: raosaheb danve comment on farmers loan waiver
Next Stories
1 आधारसाठी लांबच लांब रांगा
2 मिरची पूड फेकून दागिन्यांची चोरी
3 पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूटच्या गोपी थोनाकलची यशोपताका
Just Now!
X