रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर पुण्यातील प्रवासी संघटना व राजकीय क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. अनेकांकडून विविध निर्णयांचे स्वागत करण्यात आले, तर बहुतांश प्रवासी संघटनांनी अर्थसंकल्पातून निराशा झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
-अनिल शिरोळे (खासदार)- रेल्वेची सद्य:स्थिती व तिची आगामी दिशा लक्षात घेऊन मांडलेला हा अत्यंत पारदर्शी अर्थसंकल्प आहे. रेल्वेचा वेग, तिची कार्यक्षमता वाढविणे व पारदर्शकतेवर भर देतानाच रेल्वेची अर्थसंकल्पीय तूट भरून काढणे हा या मागील मुख्य उद्देश आहे.
-सुप्रीया सुळे (खासदार)- वेगवेगळ्या वस्तू कोंबून भरलेली एक पोतडी म्हणजे हा रेल्वे अर्थसंकल्प आहे. रेल्वे मंत्र्यांनी अनेक आश्वासने दिली असली, तरी त्यातील किती घोषणा प्रत्यक्षात येतात, हे बघावे लागेल. महाराष्ट्रासाठी ठोस तरतूद नाही.
– कन्नुभाई त्रिवेदी (पुणे प्रवासी संघ)- रेल्वे अर्थसंकल्पात फक्त धोरण सांगितले आहे. प्रवाशांच्या मागण्या हवेतच ठेवल्या गेल्या आहेत. नवीन गाडय़ांची घोषणाही केली गेली नाही. त्यामुळे कोणतीही अपेक्षा ठेवता येणार नाही. हमालाला सहायक म्हणून संबोधून फक्त मानसिक दर्जा बदलला गेला.
– हर्षां शहा (रेल्वे प्रवासी ग्रुप)- रेल्वे अर्थसंकल्पाने निराशा केली आहे. योजना व गाडय़ांची नावे बदलण्याच्या प्रकारामुळे हा ‘नामकरण अर्थसंकल्प’ झाला आहे. एकही नवी गाडी नाही. सुविधांमध्ये वाढ नाही.  पुण्यात रेल्वेचे विद्यापीठ करण्याची मागणी असताना ते बडोद्याला करण्याची घोषणा केली.
– मांगीलाल सोलंकी (पुणे- मुंबई रेल्वे प्रवासी संघ)- हमसफर, तेजस व उदय या गाडय़ांची घोषणा करण्यात आली, मात्र त्या कुठून सुटणार हे स्पष्ट नाही. पुणे अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेसची अनेक दिवसांची मागणी आहे, मात्र त्याबाबत कोणताही विचार झाला नाही.
प्रवीण चोरबेले (दि पूना र्मचट्स चेंबर)- रेल्वे अर्थसंकल्प अच्छे दिनाच्या रुळावर आहे. प्रवासी दरात कुठलीही वाढ न करता केंद्राने सर्वसामान्यांच्या जीवनाशी समन्वय साधला. मालवाहतुकीतही वाढ न करता व्यापारी वर्गाला दिलासा दिला आहे.