दोन दिवसांत पाचशे जणांनी पुस्तक बदलून नेले

पुणे : तब्बल तीन महिन्यांच्या खंडानंतर पुणे नगर वाचन मंदिर उघडताच वाचकांची झुंबड उडत आहे. पाचशे जणांनी दोन दिवसांत पुस्तक बदलून नेले आहे. संकेतस्थळाच्या मदतीने घरातच पुस्तकाची निवड करून ते उपलब्ध असल्याची खात्री करून घेत वाचकाने घरी घेऊन जाणे, अशी नवी कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील पुणे नगर वाचन मंदिराच्या मुख्य वास्तूसह मुख्य शाखेसोबत सदाशिव पेठ, वारजे, गणंजय सोसायटी, कर्वेनगर, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता येथील शाखा आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सुरू झाल्या आहेत. करोनाचे संकट ध्यानात घेता  पुस्तकांची निवड करण्याची  परवानगी देण्यात आलेली नाही.   कोणते पुस्तक हवे आहे याची मागणी वाचक ई-मेल, दूरध्वनी किंवा संदेशाद्वारे नोंदवू शकतात. नंतर ग्रंथालयात येऊन ते पुस्तक घेता येते. ही नवी पद्धत वाचकांच्या अंगवळणी पडत आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांनी दिली.  सरकारी अनुदानीत  वाचनालये तसेच शासकीय ग्रंथालये ३० जूनपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. राज्यातील टाळेबंदीमध्ये ३१ जुलैपर्यंत वाढ केल्याने ग्रंथालय संचालनालयाने सर्व ग्रंथालये बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. मात्र, पुणे नगर वाचन मंदिर ही सरकारच्या अनुदानाविना चालणारी स्वायत्त संस्था असल्याने आम्हाला हा नियम लागू होत नाही, असेही मेहेंदळे यांनी सांगितले.

वाचकांच्या सोयीसाठी

* टाळेबंदीच्या काळात वाचकांकडे असलेली पुस्तके दंड न आकारता जमा करू घेत घेतली जात आहेत.

* वाचकाकडून आलेले पुस्तक निर्जंतुक करून घेतले जाते. तीन दिवसांनंतर ते पुस्तक दुसऱ्या वाचकाला दिले जाते.

* वाचकांच्या मागणीनुसार घरपोच पुस्तक योजना सुरू आहे.

* मुखपट्टी परिधान करून आलेल्या वाचकांच्या शरीराचे तापमान यंत्राद्वारे पाहिले जाते.

* सॅनिटायझर लावूनच वाचक ग्रंथालयात प्रवेश करतील, याची दक्षता घेतली जात आहे.