पुण्यातील ओशो आश्रमातील भूखंड विक्रीस काढण्यात आल्याची बाब उघडकीस आल्यानंतर ओशोंच्या भक्तगणांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

झुरिचमधील ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन यांची मालकी असलेल्या कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमचा परिसर विस्तीर्ण आहे.  करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात ओशो आश्रमातील ध्यानकेंद्र बंद करण्यात आले. आर्थिक संकटाचे कारण पुढे करीत ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनाने एक एकराचे दोन भूखंड प्रसिद्ध उद्योजक आणि बजाज ऑटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव राहुलकुमार बजाज यांना १०७ कोटी रुपयांना विकण्याचे ठरविले आहे.  आश्रमाला लागून बजाज यांचा प्रासादतुल्य बंगला आहे. भूखंड विक्रीची कुणकुण लागल्यानंतर ओशो फ्रेंडस फाउंडेशनने या प्रक्रियेला विरोध केला आहे. जानेवारी महिन्यात ओशो आश्रमाच्या व्यवस्थापनाने म्हणजेच ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनने मुंबईतील धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे भूखंड विक्रीची परवानगी एका अर्जाद्वारे मागितली होती. त्यावर भूखंड विक्रीस मनाई करण्यात यावी, असा अर्ज ओशो फ्रेंडस फाउंडेशनने धर्मदाय आयुक्त कार्यालयात केला आहे. याबाबत ओशो फ्रेंडस फाउंडेशनचे सदस्य योगेश ठक्कर म्हणाले, भूखंड विक्रीस मनाई करण्यात यावी, असा अर्ज आम्ही केला आहे. या अर्जावर मुंबईतील धर्मदाय आयुक्त कार्यालयात १५ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

याबाबत ओशो आश्रमाच्या प्रवक्त्या माँ अमृता साधना यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही भाष्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार,  ‘ भविष्यात ओशो आश्रमातील ध्यानकेंद्र पुन्हा सुरू करण्यात येईल. मात्र, आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भूखंड विक्री करावी लागत आहे.’