जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालाचा कात्रज भागातील सच्चसाईमाता मंदिरानजीक असलेल्या राहत्या बंगल्यात खून करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अजय जयस्वाल (वय ४२, सध्या रा. कोथरूड, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रक रणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयस्वाल याचा सच्चसाईमाता मंदिराजवळ असलेल्या डोंगरावर बंगला आहे. शनिवारी जयस्वाल याच्याकडे काम करणारा कर्मचारी त्याला बंगल्यात भेटला होता. त्यानंतर कर्मचाऱ्याने जयस्वाल याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जयस्वाल याने प्रतिसाद न दिल्याने त्याला संशय आला. त्यानंतर सोमवारी कर्मचारी बंगल्यात गेला. त्याने खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा बंगल्यातील खोलीत जयस्वाल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे उघडकीस आले.

त्याने या घटनेची माहिती त्वरित पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. जयस्वाल याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले असून खुनामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. जयस्वाल घटस्फोटित असून तो कोथरूड भागात एकटाच राहात होता.