पुणे जिल्ह्य़ात सरत्या वर्षांत बलात्कार, विनयभंगाच्या गुन्ह्य़ांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बहुतांश घटनांमध्ये पीडित महिलेवर नातेवाईक आणि परिचित व्यक्तीनेच अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या घटना पाहता पीडित महिलांसाठी त्यांच्या घराच्या चार भिंतीच असुरक्षित झाल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे जिल्ह्य़ात मागील वर्षांत (२०१५) गंभीर स्वरुपाचे नऊ हजार ८५७ गुन्हे दाखल झाले आहेत. सरत्या वर्षांत पुणे जिल्ह्य़ात बलात्कार, विनयभंग, प्राणांतिक अपघात, चोरी, फसवणूक आणि दुखापत अशा प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे नातेवाईक आणि परिचित असल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी देवकर या वेळी उपस्थित होते.
सरत्या वर्षांत जिल्ह्य़ात बलात्काराचे १८१ आणि विनयभंगाचे ५०८ गुन्हे घडले. तसेच चोरीचे ४७८ आणि फसवणुकीचे २४१ गुन्हे घडले. गंभीर स्वरुपाचे ४४ अपघात झाले. घरफोडी, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, साखळी चोरी, विश्वासघात या प्रकारच्या गुन्ह्य़ांमध्ये घट झाली. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण पोलिसांनी महिला दक्षता समितीच्या माध्यमातून गावोगावी कार्यक्रम घेतले. या माध्यमातून महिलांमध्ये जागरुकता निर्माण केल्यामुळे अत्याचाराच्या घटना उघड होऊ शकल्या. पीडित महिला स्वत:हून तक्रार देण्यास पुढे येत आहेत, असे पोलिस अधीक्षक जाधव यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्य़ातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे शहर पोलिसांपाठोपाठ पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काचा (संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा) वापर करून चौदा गुन्हेगारी टोळ्यांमधील सराईत गुन्हेगारांच्या कारवायांना आळा घातला आहे. जेजुरी, बारामती, लोणीकाळभोर, शिरुर आणि पौड येथील बावीस गुन्हेगारांना जिल्ह्य़ातून तडीपार करण्यात आले आहे.

जमीन फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ
पुणे जिल्ह्य़ातील लोणावळा, राजगड, वडगांव मावळ, तळेगांव दाभाडे परिसरात गेल्या काही वर्षांपासून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्या बरोबरच एजंटांकडून फसवणूक होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. बऱ्याचदा तक्रारदाराला पोलिस ठाण्यात न्याय मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पाश्र्वभूमीवर जमीन व्यवहारात फसवणूक झालेल्या नागरिकांनी ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी केले होते. त्या अनुषंगाने पोलिसांकडे गेल्या महिन्याभरात फसवणुकीची तक्रार करणारे २२ अर्ज आले आहेत.

गेल्या वर्षांत पुणे जिल्ह्य़ात खुनाच्या १६७ घटना घडल्या. त्यापैकी १५५ खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. अनैतिक संबंध आणि कौटुंबिक वाद हे खुनाच्या बऱ्याच घटनांमागचे कारण आहे. गंभीर गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पोलीस मित्रांची मदत घेतली आहे. जिल्ह्य़ातील नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
डॉ. जय जाधव, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक