शहरातील नव्या-जुन्या पुलांचे मजबुतीकरण

शहरातील नव्या-जुन्या मिळून १९ पुलांच्या दुरुस्तीचा आणि त्यांच्या मजबुतीकरणाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या पुलांच्या दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार असून त्यासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी)च्या मदतीने ही कामे होतील. त्याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीनेही मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरातील पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू होतील आणि पुलांना नवसंजवीनी मिळेल.

मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या पुणे शहरात अनेक महत्त्वाचे पूल आहेत. यातील काही पूल ब्रिटिशकालीन आहेत. शहरात एकूण ३० हून अधिक मोठे पूल असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. सन २०१६ मध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पूल पडल्यानंतर शहरातील महत्त्वाच्या आणि जुन्या पुलांच्या दुरुस्तीचा विषय पुढे आला होता.

शहरातील पुलांचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) करण्याचा निर्णय त्यावेळी महापालिकेने घेतला होता. त्याबाबतची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. त्यानुसार शिवाजी पूल, वेलस्ली पूल, संभाजी पूल, डेंगळे पूल, बालगंधर्व रंगमंदिर येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आणि राजाराम पूल या सात पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने ही कामे करण्यात आली होती. शहरातील नव्या आणि जुन्या पुलांची दुरुस्ती करण्यासाठी सीओईपी या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर सबडक्शन झोन कन्सलटंट यांच्या मार्फत पुन्हा पुलांचे लेखापरीक्षण करण्यात आले. यापूर्वी केलेल्या लेखापरीक्षणानुसार सात पुलांच्या दुरुस्तींची कामे अद्याप बाकी आहेत. त्यातच नव्याने सन २०१८-१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार १२ पुलांच्या मजबुतीकरणाची कामे करणे अत्यावश्यक असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार या सर्व मिळून १९ पुलांच्या दुरुस्तींचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुलांच्या मजबुतीकरणाची कामे सुरू होणार असून पुलांना नवसंजीवनी मिळणार आहे.

मजबुतीकरणासाठी योजना

मुठा नदीवर १५ पूल असून त्यापैकी संभाजी, शिवाजी, जुना संगम पूल, वेलस्ली पूल हे ब्रिटिशकालीन पूल आहेत. मुळा नदीवरील पुलांची संख्या १० असून जुना हॅरीस पूल, होळकर हे जुने पूल आहेत. सद्य:स्थितीमध्ये बंडगार्डन पूल वगळता अन्य पुलांचा वापर वाहतुकीसाठी होत आहे. या पुलांच्या मजबुतीकरणासाठी योजना प्रस्तावित आहे.

या पुलांचा समावेश

बंडगार्डन नदीवरील पूल, जुना होळकर पूल, औंध-वाकड पूल, भिडे पूल, सावरकर पूल, पौड रस्ता उड्डाणपूल, नीलायम चित्रपटगृहा जवळील पूल, न्यूमॅटिक रेल्वे उड्डाणपूल, साधू वासवानी पूल, कोरेगाव पार्क रेल्वे उड्डाणपूल, अलंकार चित्रपटगृहाजवळील रेल्वे उड्डाणपूल, जुना संचेती पूल, प्रिन्स आगाखान उड्डाणपूल, यशवंतराव चव्हाण पूल, गाडगीळ पूल, संगम पूल (दगडी), संगम पूल, जुना बंड गार्डन पूल, राजीव गांधी पूल, बोपोडी पूल या प्रमुख पुलांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पुलांचे सुशोभीकरण

महापालिकेच्या विद्युत विभागाकडून गाडगीळ पूल, स्वारगेट उड्डाणपूल, शिवाजी पूल, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पूल, यशवंतराव चव्हाण पूल, संभाजी पूल, बालगंधर्व रंगमंदिर येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, बंडगार्डन पूल या पुलांवर विद्युत रोषणाईविषयक कामे करणार आहेत.  रंगरंगोटी, अनुषंगिक कामे पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी पूर्वगणन पत्रक तयार केले आहे. त्यासाठी ८४ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. पुलांच्या सुशोभीकरणाचा प्रस्तावही मंजूर झाला आहे.