शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे : रेमडेसिवीर औषधाची महापालिके ने तातडीने खरेदी करून शहरातील रुग्णांना त्याचे विनामूल्य वाटप करावे, अशी मागणी शिवसेनेचे महापालिके तील गटनेता पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त विक्रम कु मार यांच्याकडे के ली आहे. शहरातील करोना काळजी केंद्रे (कोविड के अर सेंटर – सीसीसी) तातडीने सुरू करावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पृथ्वीराज सुतार यांनी याबाबतचे निवेदन आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे. शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज साधारणपणे पाच हजार रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. एका महिन्यापूर्वी उपचारातील गैरसोयींबाबत लेखी निवेदन आयुक्तांना पक्षाकडून देण्यात आले होते. करोना काळजी केंद्र त्वरित सुरू करावीत, प्राणवायू सुविधांच्या खाटांची क्षमता वाढविण्याचे नियोजन करावे, कृत्रिम श्वसन यंत्रणा वाढविण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षीप्रमाणेच करोना काळजी केंद्रे सुरू झालेली नाहीत. सक्रिय रुग्णांची संख्या आणि मृत्युदर वाढत असतानाही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.

करोना संकटामुळे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करून सर्व खातेप्रमुखांची बैठक घ्यावी. प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी, खाटांच्या माहितीसाठी नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावा, रेमडेसिवीर औषधांची तातडीने खरेदी करून ते रुग्णांना विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्याही पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्तांकडे के ल्या आहेत.