मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पण न्यायालयात महाविकास आघाडी सरकारकडून बाजू मांडली जाताना दिसत नाही. तर आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत. मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी मराठा आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली, या बैठकीनंतर ते बोलत होते.

आमदार मेटे म्हणाले की, मराठा आरक्षण बाबतचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. या आरक्षणासाठी राज्य सरकार मार्फत उपसमिती नेमण्यात आली. त्या उपसमितीचे अध्यक्षपद अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. यापुर्वी देखील राज्याचे मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाण यांनी भूषविले आहे. त्यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी कोणतेही निर्णय घेतले नाही. आता सरकारमधील उपसमितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असताना देखील समजाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेत नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना उपसमिती पदावरून हटविण्यात यावे. ते जबाबदारी सांभाळण्यात निष्क्रिय ठरले असल्याने, आता त्या पदावर महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सारख्या कोणत्याही नेत्याला महाविकास आघाडीतील जबाबदारी द्यावी. अशी मागणी त्यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की, एवढ्या सर्व घडामोडी घडत असताना. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील मंत्र्यांना आदेश देताना दिसत नाहीत. मुख्यमंत्र्याचा देखील निषेध आम्ही करत असून मुख्यमंत्री डोळे मिटून शांत बसले आहेत, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

तसेच, अशोक चव्हाण यांना उपसमिती पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक दौर्‍यावर आहेत, या निमित्त त्या ठिकाणी उद्या क्रांती दिनी जागरण गोंधळ, मशाली पेटवून आणि काळे कपडे घालून आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्यास पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करणार आहे. तसेच या पुढील काळात आघाडी सरकारमधील मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.