गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी हे सध्या कारागृहात आहेत. डीएसकेंच्या कारकीर्दीवर आधारित धड्याचा सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. हा धडा राज्य सरकारने मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते हेमंत टकले यांनी केली आहे. डीएसकेंच्या धड्यातून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायचा असा, सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यशोगाथा या पुस्तकात डीएसकेंवर एक प्रकरण आहे. या प्रकरणात डीएसकेंचा संघर्ष, यश, प्रेरणा याचा समावेश आहे. २०१३ मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. प्रा.प्र.चिं.शेजवलकर याचे लेखक असून त्यांनी या पुस्तकात समाजातील आणखी काही प्रतिष्ठित आणि प्रेरणादायी व्यक्तींवर लिहिले आहे. पुणे विद्यापीठाने डीएसकेंवरील या प्रकरणाचा वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे.

हेमंत टकले यांनी आता या धड्यावर आक्षेप नोंदवला असून डीएसकेंकडून विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यावा, असा सवाल उपस्थित केला आहे. एकंदर डीएसकेंवर सध्या सुरू असलेल्या खटल्यामुळे प्राध्यापकांनाही विद्यार्थ्यांना यातून काय शिकवायचे असा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, डीएसकेंवर गुंतवणूकदारांची फसवणूक करत २०४३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती हे अटकते असून मुलगा शिरीष, जावई केदार वांजपे, पुतणी सई वांजपे, डीएसके कंपनीचे सीईओ धनंजय पाचपोर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.