अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर निर्णय

पुणे : निवास व्यवस्था असलेली हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी पुण्यातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू होण्यास आठ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरात करोनाबाधितांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्यामुळे हॉटेल संघटना, पालकमंत्री आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. शुक्रवारी अजित पवार यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर हॉटेल्स सुरू करण्यासंदर्भातील निर्णय होणार आहे.

निवासी व्यवस्था असलेली हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार बुधवारपासून (८ जुलै) निवासी हॉटेल सुरू होतील.  पुण्यात मात्र ती बुधवारपासून सुरू होणार नाहीत, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

ते म्हणाले की, राज्य शासनाने हा निर्णय घेताना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बुधवारपासून हॉटेल्स सुरू करण्यात येणार नाहीत. येत्या दोन दिवसांत हॉटेल व्यावसायिक संघटना, पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे या परिस्थितीत हॉटेल्स, लॉज सुरू करण्यास मान्यता देणे शक्य आणि संयुक्तिक होईल का, याचा आढावा घेण्यात येईल. पालकमंत्री अजित पवार हे शुक्रवारी आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल. हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस बंदच ठेवण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र परिस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत ती सुरू करणे योग्यही होणार नाही. त्याबाबतचा अंतिम निर्णय शुक्रवारनंतरच जाहीर के ला जाईल, असे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.