विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून अन्य पक्षात गेलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी काही पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना पक्षात अजिबात स्थान देण्यात येऊ नये, असा ठराव काँग्रेसच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. पक्षाच्या काही गद्दार पदाधिकाऱ्यांमुळे विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्याबाबाबतही या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

शहर काँग्रेसची रविवारी काँग्रेस भवनात बैठक झाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पाश्र्वभूमीवर या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचेही अभिनंदन करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील अनेक नेते, आजी-माजी पदाधिकारी काँग्रेसला सोडून अन्य पक्षात गेले. पक्षाने महत्त्वाची पदे देऊनही पक्षाशी झालेल्या गद्दारीबाबत कार्यकर्त्यांनी या बैठकीत नाराजी व्यक्त केली. सत्ता आल्यामुळे पक्ष सोडून गेलेले काही पदाधिकारी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासाठी काही नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करात आहेत. अशा पदाधिकाऱ्यांना पक्षात अजिबात स्थान देण्यात येऊ नये, पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांची जागा दाखवून देण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले. तसा ठराव नगरसेवकांकडून देण्यात आल्यानंतर तो मंजूरही करण्यात आला.

विधानसभा विनडणुकीत पक्ष सोडून गेलेल्यांना प्रोत्साहन देण्याचे काम पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी केले. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे पक्षाची हानी होत आहे. अशा गद्दारांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठविण्यात येणार आहे. कोणी कोणी कोणती कारस्थाने केली, याबाबतचा अहवाल तयार करण्यात येऊन तो नावासह जाहीर करण्यात येणार आहे.

– रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष