हिंदू-मुसलमान, जम्मू-काश्मीर, कलम ३७०, भारत पाकिस्तान, राम मंदिर-बाबरी मशीद याबाबतचे कुठलेही विषय, तसेच जाती धर्मांबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय घेऊन ‘फिरोदिया करंडक’ आंतरमहाविद्याालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेत विद्यार्थ्यांना   सादरीकरण करता येणार नाही. त्या बाबतचे निर्देश आयोजकांनी विद्यार्थ्यांना  दिले असून या विषयांशी संबंधित सादरीकरण केल्यास त्याचा पारितोषिकासाठी विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी या संस्थेतर्फे फिरोदिया करंडक आंतरमहाविद्याालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येते. रंगमंचावरील चित्रपट असे या स्पर्धेचे वर्णन केले जाते. स्पर्धेच्या गेल्या ४५ हून अधिक वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांना  विषय निवडीबाबत आयोजकांडून नियम किंवा निर्देश देण्यात आले नव्हते. मात्र, यंदा पहिल्यांदाच धार्मिक-जातीय, राजकीय पार्श्वभूमीवर असलेले विषय घेऊन सादरीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

आयोजकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या नियमावलीत या संदर्भातील नियमांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जारी केलेल्या निर्देशांनुसार हिंदू-मुसलमान, जम्मू-काश्मीर, कलम ३७०, भारत पाकिस्तान बाबत कुठलेही विषय, राम मंदिर-बाबरी मशीद या बाबतचे कोणतेही विषय आणि जाती धर्मांबाबत भाष्य करणारे संवेदनशील विषय घेऊन विद्यार्थ्यांना  सादरीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेच या प्रकारचे कुठलेही विषय घेऊन सादरीकरण केल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता संबंधित संघाचा सांघिक अथवा वैयक्तिक पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही,’ असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्याचे सामाजिक-राजकीय वातावरण संवेदनशील आहे. आजूबाजूला, माध्यमांमधूनही जात-धर्म, मंदिर-मशीद, भारत पाकिस्तान याच विषयांची सातत्याने चर्चा होत आहे. त्याशिवाय स्पर्धेतील विषयांमध्ये तोचतोचपणा येऊ लागल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ, गेल्यावर्षीच्या अंतिम फेरीतील नऊ सादरीकरणांपैकी पाच सादरीकरणे याच विषयांशी संबंधित होती. त्यामुळे विद्यााथ्र्यांनी या विषयांच्या पलीकडे जाऊन वेगळा विचार करावा अशी अपेक्षा आहे. तसेच हे निर्बंध कायमस्वरूपी नाहीत किंवा विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला रोखण्याचाही हेतू नाही. महाविद्याालयीन वयात किंवा हौशी पातळीवर संवेदनशील विषयांवर कशा पद्धतीने भाष्य करावे याची समज नसते. काहीवेळा विद्यार्थ्यांनी  सादर केलेली संहिता आणि प्रत्यक्ष सादरीकरण यात तफावत असते. त्यामुळे विद्यार्थी काय सादर करतील याची खात्री नसते. त्यामुळे सादरीकरणांतून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया आयोजक अजिंक्य कुलकर्णी यांनी दिली आहे.

विनोदी सादरीकरणासाठी पहिल्यांदाच पारितोषिक
स्पर्धेत पहिल्यांदाच विनोदी सादरीकरणासाठी सांघिक पारितोषिक दिले जाणार आहे. स्पर्धेच्या निकषांत बसल्यास प्रथम, द्वितीय, तृतीय या सांघिक क्रमांकात किंवा स्वतंत्र पारितोषिक म्हणूनही विचार केला जाऊ शकतो, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.