कात्रज-देहूरोड बाहय़वळण मार्गावर अपघातांच्या घटनांत वाढ

कात्रज-देहूरोड बाहय़वळण मार्गावरील  किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या अपघातांच्या घटनांमुळे वाहतूक पोलिसांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या रस्त्यावरील अपघाती जागांच्या ठिकाणांची दुरुस्ती करावी, काही ठिकाणी पायाभूत सुधारणा कराव्यात, तसेच रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढावीत, असे पत्र काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. मात्र पोलिसांकडून देण्यात आलेल्या पत्राकडे महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे.

रावेत ते कात्रज दरम्यान असलेल्या बाहय़वळण मार्गाची लांबी २९ किलोमीटर आहे. या मार्गावरून मुंबई तसेच बंगळुरूकडे प्रवासी आणि मालवाहू वाहने मोठय़ा प्रमाणावर जातात. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील उपनगरे या बाहय़वळण मार्गालगत आहेत. कात्रज, भारती विद्यापीठ, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, बावधन तसेच पिंपरी-चिंचवडमधील वाकड, रावेत, पुनावळे भाग बाहय़वळण मार्गालगत आहे. बाहय़वळण मार्गावर अवजड वाहनांचे ब्रेक निकामी होऊन गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत. वारजेतील डुक्करखिंड ते चांदणी चौक, नऱ्हे ते वडगाव बुद्रुक परिसरातील अपघातांचे प्रमाण जास्त आहे. बाहय़वळण मार्ग ओलांडणे पादचाऱ्यांसाठी अवघड बनले आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

वाहतूक पोलिसांकडून गेल्या पाच वर्षांत या मार्गावर झालेल्या अपघातांच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. ज्या भागात अपघात झाले आहेत तेथे तीव्र उतार आहेत. काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. बाहय़वळण मार्गावर काही ठिकाणी चुकीच्या ठिकाणी वळण (पंक्चर) ठेवण्यात आले आहेत, तसेच काही भागांत वाहनचालकांना सूचना देणारे फलक नाहीत. या सर्व बाबी पोलिसांकडून करण्यात आलेल्या पाहणीत नमूद करण्यात आल्या आहेत, असे वाहतूक शाखेच्या नियोजन विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी सांगितले.

ते म्हणाले, बाहय़वळण मार्गालगत शैक्षणिक संस्था आहेत. विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याची गरज आहे. वाकड येथे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल बांधणे गरजेचे आहे. सूस पूल अरुंद आहे. हा पुलावरील रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. डुक्कर खिंड भागातील रस्त्यावर काही सुधारणा करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी बाहय़वळण मार्गावर कठडे (क्रॅश बॅरीअर) नाहीत. वारजे भागातील माई मंगेशकर रुग्णालयासह काही भागांत वाहतुकीच्या नियमांची माहिती देणारे फलक बसवणे गरजेचे आहे. या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसाकंडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिसांकडून ११ ऑक्टोबर २०१७ रोजी महामार्ग प्राधिकरणाला या बाबत पत्र देण्यात आले आहे.

अतिक्रमणांवर कारवाईची गरज

चांदणी चौक ते वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाच्या दरम्यान बाहय़वळण मार्गालगत अनेकांनी टपऱ्या तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या गाडय़ा लावलेल्या आहेत. या रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे काढून टाकण्याची गरज आहे. या बाबत वाहतूक पोलिसांकडून  महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाला वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

मार्गावर १२ अपघातप्रवण क्षेत्र

रावेत ते कात्रज बोगद्यादरम्यान बारा अपघातप्रवण क्षेत्र  आहेत. अपघातप्रवण क्षेत्र पुढीलप्रमाणे- नवीन कात्रज बोगदा, कात्रज चौक, नवले पूल, वडगाव पूल, मुठा नदीवरील पूल, वारजे माई मंगेशकर रुग्णालय, डुक्कर खिंड, बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, बावधन पूल, पुनावळे पूल, वाकड  येथील भूमकर चौक, मुळा नदीवरील पूल