रखवालदारांना बांधून ६५ लाखांची रोकड लुटली

दौंड तालुक्यातील राहू गावात असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर शनिवारी मध्यरात्री चोरटय़ांनी दरोडा घातला. चोरटय़ांनी रखवालदारांना चाकूचा धाक दाखवून दोरीने बांधले. त्यानंतर खिडकीची जाळी कापून चोरटय़ांनी बँकेतील ६५ लाख ५७ हजारांची रोकड लुटून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर दौंड तालुक्यात खळबळ उडाली.

दीपक कैलास भालेराव (वय २५,रा.वाळकी, ता. दौंड)आणि उत्तम मारुती वाघ (वय ६५, रा. राहू, ता. दौंड) अशी जखमी झालेल्या रखवालदारांची नावे आहेत.  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राहू शाखेचे नितीन कांबळे शाखा व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी ( ९ सप्टेंबर) बॅंकेचे कामकाज सायंकाळी सहाच्या सुमारास संपले. त्यानंतर बँक बंद करण्यात आली.

हडपसर येथील अनिकेत सिक्युरिटी सव्‍‌र्हिसेसकडून बँकेत भालेराव आणि वाघ यांची रखवालदार म्हणून तेथे नेमणूक करण्यात आली आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास चार चोरटे बँकेच्या इमारतीत आले. तेथे रात्रपाळीत नेमणुकीस असलेले रखवालदार भालेराव आणि वाघ यांना चाकूचा धाक दाखविला. त्यानंतर चोरटय़ांनी दोघांना दोरीने बांधून ठेवले.

इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीची जाळी गॅसकटरच्या साहाय्याने कापली. खिडकीवाटे चोरटे बँकेत शिरले. बँकेतील स्ट्रॉंगरुमची कुलपे गॅसकटरने कापली.

लॉकर रुमची कुलपे चोरटयांनी तोडली. ६५ लाख ५७ हजार ४८५ रुपये घेऊन चोरटे पसार झाले. रखवालदारांनी आरडाओरडा केला. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना ग्रामस्थांनी दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांच्या श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. चोरटय़ांचा माग काढण्याासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण तपास करत आहेत.