जिल्हा प्रशासनाकडून वाटप; बँक खाते नसल्याने निधी वाटपात अडथळा

मुठा उजवा कालवा दुर्घटनेतील बाधितांना राज्य शासनाकडून तीन कोटी रुपयांचा मदतनिधी ५ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून बाधितांना मदतनिधी वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत पूर्णत: बाधित ३८ कुटुंबांना १९ लाख रुपये, तर अंशत: बाधित २८ कुटुंबांना ११ लाख ४३ हजार असे एकूण ३० लाख ४३ हजार रुपयांचा मदतनिधी वाटप करण्यात आला आहे. उर्वरित बाधितांचे बँक खाते उपलब्ध नसल्याने मदतनिधीमध्ये अडथळा येत आहे.

मुठा उजवा कालवा फुटण्याच्या दुर्घटनेमुळे ओढवलेली परिस्थिती आणि घटनेची तीव्रता पाहून विशेष बाब म्हणून बाधितांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. कालवा फुटण्याची घटना नैसर्गिक आपत्ती नसली, तरी देखील मानवनिर्मित आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून शासनाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार ७३० कुटुंबे बाधित झाली असून ८८ कुटुंबे पूर्णत:, तर ८६४ कुटुंबे अंशत: बाधित झाली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे घेण्यात आल्यानंतर संबंधित कुटुंबाची पडताळणी करून मदतनिधी वाटप सुरू करण्यात आले आहे.

दुर्घटनेमध्ये पक्क्या घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब ९५ हजार शंभर रुपये, कच्ची घरे/झोपडीधारकांना आणि किमान पंधरा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पक्के-कच्चे घर किंवा झोपडीधारकांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. ही मदत घरदुरुस्ती, पुनर्बाधणीसाठी वापरण्यात यावी, असे शासनाच्या शासन निर्णयात नमूद केले आहे. निधी महिन्याच्या आत बाधितांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बँक खात्यात रक्कम जमा

शासनाच्या आदेशानुसार मंगळवापर्यंत ३८ पूर्णत: बाधितांना १९ लाख, २८ अंशत: बाधितांना ११ लाख ४३ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित बाधितांचे बँक खाते उपलब्ध नसल्याने संबंधितांना अद्याप मदतनिधी देण्यात आलेला नाही. शासनाच्या आदेशानुसार बाधितांच्या थेट बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.