News Flash

वाहन परवान्याच्या चाचणीमधील नापासांना पुनर्चाचणीची एकच संधी!

सद्य:स्थितीत नापासांना केवळ एकच संधी देऊन परिवहन विभागाकडून कायदा धाब्यावर बसविला जात असल्याचा आरोप होत आहे.

वाहन परवान्याच्या चाचणीमधील नापासांना पुनर्चाचणीची एकच संधी!

वाहन परवाना चाचणीच्या अपुऱ्या क्षमतेमुळे वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी सर्वच नागरिकांना सध्या एक दिव्यच पार करावे लागत असतानाच चाचणीत नापास होणाऱ्यांसाठी हे दिव्य अधिकच कठीण झाले आहे. वाहन चाचणीत नापास झाल्यानंतर संबंधिताला पुनर्चाचणीच्या तीन संधी देण्याबाबत मोटार वाहन कायदा सांगत असला, तरी सद्य:स्थितीत नापासांना केवळ एकच संधी देऊन परिवहन विभागाकडून कायदा धाब्यावर बसविला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वाहन परवाना मिळविण्यासाठी नापासांच्या नाकीनऊ येत असल्याची स्थिती आहे.
वाहन परवाना मिळविण्यासाठी अर्जाची प्रक्रिया व प्रत्यक्ष वाहन चालविण्याची चाचणी देण्याची वेळ घेण्यासाठी सध्या ऑनलाईन पद्धत राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय व पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत मोटार चालविण्याचा परवाना मागणाऱ्यांची चाचणी नाशिक फाटा येथील केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या चाचणी मार्गावर घेण्यात येते. हा चाचणी मार्ग अत्याधुनिक व वाहन चालकाची खऱ्या अर्थाने चाचणी घेण्यास सक्षम आहे. त्याचा परिणाम म्हणून वाहनांची चाचणी देणाऱ्यांमध्ये नापासांचे प्रमाण वाढले आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चाचणीमध्ये नापास झालेल्या नागरिकाला पुनर्चाचणीच्या तीन संधी मिळणे आवश्यक आहे. पहिल्यांदा नापास झाल्यास पुढील आठ दिवसांतच संबंधिताची पुन्हा चाचणी घेण्याचे बंधनही कायद्यात आहे. मात्र, सद्य:स्थितीत चाचणीत नापास झाल्यास पुन्हा चाचणीची केवळ एकच संधी दिली जात आहे. त्याचप्रमाणे ही चाचणी घेण्यासाठीही पुन्हा ऑनलाईन पद्धतीने वेळ घ्यावी लागत असल्याने एकदा नापास झाल्यास दुसऱ्या चाचणीसाठी पुन्हा दीड ते दोन महिने थांबावे लागते. दुसऱ्या चाचणीतही नापास झाल्यास संबंधिताला पुन्हा शिकाऊ वाहन परवान्याचा अर्ज करण्यापासून पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पुन्हा पक्क्य़ा वाहन परवान्यासाठी चाचणीची वेळ येईपर्यंत वर्षभराचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. या किचकट व वेळखाऊ पद्धतीमुळे नापास उमेदवार धास्तावले आहेत.
शहरात वाहन परवाना मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण, त्या तुलनेत चाचणी मार्गाची क्षमता नाही. पुणे आरटीओकडून एकीकडे महिन्याला साडेचारशेहून अधिक नागरिकांना शिकाऊ परवाना दिला जात असताना पक्या परवान्यासाठी केवळ २३० जणांनाच चाचणीची वेळ दिली जाते. त्यामुळे क्षमता वाढीशिवाय नागरिकांचे हाल थांबणार नसल्याचे चित्र आहे.

‘‘चाचणीत नापासांना दोन संधींपासून वंचित रहावे लागते. त्याचप्रमाणे इतरांनाही परवाना मिळविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळे चाचणी मार्गाची क्षमता वाढविण्याची मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. त्यासाठी एक कोटी साठ लाखांचा खर्च आहे. मात्र, हे काम होण्यापूर्वी इतर ठिकाणी चाचणी घेण्याबाबत प्रशासनाने ठोस उपाय केले पाहिजेत. त्यातूनच नागरिकांचे वाहन परवान्यासाठी होणारे हाल थांबू शकणार आहेत.’’
– राजू घाटोळे,
अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 3:15 am

Web Title: rto against rules regarding driving license test
टॅग : Rto
Next Stories
1 ‘पुणे सार्वजनिक सभे’चे अध्यक्षपद प्रथमच महिलेकडे
2 उन्हाळी सुटीत व्हा बाल वैज्ञानिक!
3 एप्रिलमध्ये कन्हैयाची पुण्यात सभा, ‘ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन’ची माहिती
Just Now!
X