वीज यंत्रणेचे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, मुळशी आदी तालुक्यांसह अनेक भागांत गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे यंदा चक्रीवादळाचाही या भागाला फटका बसला. त्यात  गंजलेले शेकडो वीजखांब उन्मळून पडल्याने यंत्रणेची मोठी हानी झाली. त्यामुळे आता पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये प्रामुख्याने गंजरोधक वीज खांब उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. अतिवृष्टीच्या कोकण विभागात अशा प्रकारचे वीजखांब सर्वप्रथम उभारण्यात आले असून, त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

पावसाचे प्रमाण अधिक असल्याने सध्याचे वीज खांब गंजून कोसळण्याची भीती असलेल्या भागांमध्ये गंजरोधक ‘जीआय’ प्रकारातील वीजखांब बसविण्याचे निर्देश नुकतेच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो आहे. काही भागांत कोकणप्रमाणे अतिवृष्टीही होत आहे. त्यातच यंदा निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका पुणे जिल्ह्यातील काही भागालाही बसला. निसर्ग चक्रीवादळाच्या मार्गात असलेल्या भागांत वीज यंत्रणेची मोठी हानी झाली. विजेचे खांब कोसळल्याने अनेक भागातील वीज खंडित झाली. डोंगराळ आणि दुर्गम भागात कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी मोठा कालावधी लागला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही भर पावसात दिवस-रात्र दुरुस्तीचे काम केले.

वीज क्षेत्रातील जाणकारांनुसार वीज यंत्रणेची सर्वाधिक हानी गंजलेल्या वीज खांबांमुळे झाली. सध्याच्या खांबांना पाणी लागल्यास त्यांना गंज लागतो. खांबाच्या तळाशी सातत्याने पाणी साचत असल्यास गंजाबरोबरच खांबाला छिद्रं पडतात आणि वेगवान वारे आल्यास खांब कोसळतात. एका खांबासह जवळच्या पाच-सहा खांबांचे आणि पर्यायाने वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होते. अलीकडच्या काळात जिल्ह्यात असेच प्रकार आढळून आले आहेत.