‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर याचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र मराठीमध्ये अनुवादित होत असून ३० मे रोजी सचिनच्या उपस्थितीत ते वाचकांसाठी खुले होत आहे. मेहता पब्लिशिंग हाउसने या आत्मचरित्राची २० हजार प्रतींची पहिली आवृत्ती काढली आहे.
सचिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन करण्यात आले. ३० मे रोजी सचिनच्या उपस्थितीत हे पुस्तक वाचकांच्या हाती देण्यात येणार असून पहिल्या दोन हजार प्रतींवर दस्तुरखुद्द सचिन स्वाक्षरी देणार आहे. या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ३० मे रोजी पुण्यामध्ये होत असून त्यास क्रिकेटपटू रवी शास्त्री, अनिल कुंबळे आणि क्रीडा समीक्षक हर्ष भोगले उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवडय़ात मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर येथे कार्यक्रम होणार आहेत. सचिनच्या मराठी आत्मचरित्रासाठी वाचक आतुरतेने वाट पाहत होते. २० मेपर्यंत पूर्वनोंदणी करणाऱ्या वाचकांना हे पुस्तक सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रकाशक अनिल मेहता आणि सुनील मेहता यांनी शुक्रवारी दिली. मराठी कुटुंबात जन्मलेल्या सचिनचा देदीप्यमान प्रवास या पुस्तकातून रेखाटण्यात आला आहे, असे अनुवादक दीपक कुळकर्णी यांनी सांगितले.
दोन दशकांनंतर मोठी आवृत्ती
सचिनच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती २० हजार प्रतींची काढण्यात येणार आहे. दोन दशकांपूर्वी दूरदर्शनवर ‘स्वामी’ मालिका सुरू असताना रणजित देसाई यांच्या ‘स्वामी’ कादंबरीची ४० हजार प्रतींची आवृत्ती काढण्यात आली होती. तर, १९९३ मध्ये ‘श्रीमान योगी’ या साहित्यकृतीची २२ हजार प्रतींची आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती, अशी माहिती सुनील मेहता यांनी दिली. सचिनच्या पुस्तकाची आवृत्ती सध्या २० हजार प्रतींची असली तरी ती ५० हजार प्रतींपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2015 रोजी प्रकाशित
‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचे आत्मचरित्र मराठीत
सचिन तेंडुलकर याचे ‘प्लेइंग इट माय वे’ हे आत्मचरित्र मराठीमध्ये अनुवादित होत असून ३० मे रोजी सचिनच्या उपस्थितीत ते वाचकांसाठी खुले होत आहे.

First published on: 25-04-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar autobiography playing it my way