तयार खाद्यपदार्थ आरोग्यासाठी सुरक्षित आहेत का, याचा पुरावा आता ग्राहकांना पदार्थाच्या वेष्टनावरच मिळणार आहे. ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस्’ कायद्यातील नवीन दुरूस्तीनुसार खाद्यपदार्थ उत्पादकांना अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) घेतलेल्या परवान्याचा अथवा नोंदणीचा क्रमांक पदार्थाच्या वेष्टनावर छापणे बंधनकारक असणार आहे. यामुळे पदार्थाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उत्पादकाकडे परवाना आहे की नाही, हे ग्राहकांना वेष्टन पाहूनच कळणार आहे.
एफडीएच्या अन्न विभागाचे सहायक आयुक्त दिलीप संगत आणि शिवाजी देसाई यांनी ही माहिती दिली. कायद्यातील दुरूस्तीनुसार उत्पादकांनी ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस् अॅथॉरिटी ऑफ इंडिया’चे (एफएसएसएआय) बोधचिन्ह आणि त्याबरोबर चौदा आकडी क्रमांक वेष्टनावर छापायचा आहे. या क्रमांकातील पहिला आकडा उत्पादक परवानाधारक आहे की नोंदणीधारक ते दर्शवणार आहे. उत्पादकाची वार्षिक उलाढाल बारा लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर त्याने एफडीएचा परवाना घेणे आवश्यक असते. याहून कमी वार्षिक उलाढाल असलेल्या अन्न उत्पादकांना नोंदणी करावी लागते. क्रमांकातील पुढील दोन आकडे उत्पादक कोणत्या राज्यातील आहे हे दर्शवतात. त्यापुढील आकडे पदार्थाचे उत्पादन वर्ष, परवाना ज्याने दिला त्या अधिकाऱ्याचा क्रमांक आणि परवाना क्रमांक दर्शवण्यासाठी आहेत.
हा चौदा आकडी क्रमांक प्रत्येक उत्पादकासाठी वेगळा असल्याने खोटा क्रमांक छापणारा उत्पादक लगेच पकडला जाऊ शकणार आहे. एफएसएसएआयतर्फे ही दुरूस्ती ७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत सर्व अन्न उत्पादकांना तिचे पालन करावे लागणार आहे.
वेष्टनावरून मांसाहारी पदार्थ ओळखणे होणार सोपे!
सध्या शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ ओळखण्यासाठी शाकाहारी पदार्थाच्या वेष्टनावर चौकोनात हिरव्या रंगाचे भरीव वर्तुळ तर मांसाहारी पदार्थाच्या वेष्टनावर चौकोनात तपकिरी रंगाचे भरीव वर्तुळ छापले जाते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस्च्या लेबलिंगसाठीच्या प्रस्तावित नियमावलीत मांसाहारी पदार्थावर तपकिरी रंगाच्या मोकळय़ा त्रिकोणात तपकिरी भरीव वर्तुळ छापले जावे, अशी तरतूद आहे. ही तरतूद लागू झाल्यास विशिष्ट चिन्हामुळे मांसाहारी पदार्थ ओळखणे ग्राहकांसाठी सोपे होणार आहे.