24 September 2020

News Flash

साहित्य अकादमीचा सन्मान कसा परत करणार?

कर्णाला कवचकुंडले चिकटली तसा पुरस्कार त्या व्यक्तीला चिकटून राहतो.

साहित्य अकादमीतर्फे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत बहुलकर आणि आनंद प्रकाश दीक्षित यांना बुधवारी भाषा सन्मान प्रदान करण्यात आला. 

पुरस्कार वापसीबद्दल विश्वनाथ प्रसाद तिवारी यांचा प्रश्न

एखाद्या क्षेत्रात केलेल्या तपसाधनेचा गौरव म्हणून साहित्य अकादमीतर्फे साहित्यिकाचा सन्मान केला जातो. कर्णाला कवचकुंडले चिकटली तसा पुरस्कार त्या व्यक्तीला चिकटून राहतो. त्यामुळे पैसे परत करता येतात. जमीन परत करता येते. पण, सन्मान कसा परत करणार, असा प्रश्न उपस्थित करून साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी पुरस्कार वापसीबद्दल बुधवारी मतप्रदर्शन केले.

साहित्य अकादमीतर्फे ज्येष्ठ हिंदूी साहित्यिक आनंद प्रकाश दीक्षित आणि संस्कृतचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांना तिवारी यांच्या हस्ते भाषा सन्मान प्रदान करण्यात आला. अभिजात आणि मध्ययुगीन साहित्यातील योगदानाबद्दल या दोघांना गौरविण्यात आले. अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव या वेळी उपस्थित होते.

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करण्याचा कालखंड आला होता. देशामध्ये घडत असलेल्या घडामोडींचा निषेध करीत अनेकांनी अकादमीचा पुरस्कार परत केला. त्या काळात आम्ही कोणतेही मतप्रदर्शन केले नाही, याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले. अकादमीचा सन्मान हा साहित्यिकाच्या तपसाधनेचा गौरव असतो. असा सन्मान केल्यामुळे साहित्य अकादमीच्या गौरवामध्ये भर पडत असते, असेही तिवारी यांनी सांगितले. प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्य ही आपल्या भारताची समृद्धी आहे. पण, प्राचीन आणि मध्ययुगीन साहित्याविषयीचा अभ्यास आणि संशोधनपर लेखन फारसे होताना दिसून येत नाही, असेही तिवारी यांनी सांगितले.

आत्मबोध, आत्मशोध आणि भाषा-साहित्याची विवेक जागृती या भूमिकेतून माझ्या हातून थोडेफार लेखन झाले, अशी भावना दीक्षित यांनी व्यक्त केली. माझ्यातील सर्जक केव्हाच मागे पडला आहे. त्यामुळे प्रारंभीच्या काळात कविता, कथा, निबंध आणि गद्यलेखन माझ्या साहित्यिक जीवनाचे सूत्र होते यावर माझाच विश्वास बसत नाही, असेही त्यांनी सांगितले.

ज्ञान कधीही अभेद्य नसते. ज्ञान हे विकासमान आणि गतिशील असते. या विकासामध्ये योगदान देण्यामध्येच कोणत्याही लेखकाचे अस्तित्व सामावलेले असते, असे मत दीक्षित यांनी व्यक्त केले.

भाषेचा उगम आणि विकास, विविध धर्म-पंथ आणि संप्रदायाच्या लोकांच्या माध्यमातून झालेला संस्कृत भाषेचा संकर हा माझ्या अभ्यासाचा विषय राहिला, असे सांगून डॉ. बहुलकर म्हणाले, संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश भाषेतील अनेक हस्तलिखितांचा अद्यापही अभ्यास झालेला नाही. मात्र, सध्याच्या काळात परदेशी विद्यार्थी, अभ्यासक आणि संशोधकांसमवेत भारतीय हस्तलिखितांच्या ठेव्यासंदर्भात काम करण्याचा लाभ उठविण्याची आवश्यकता आहे. के. श्रीनिवास राव यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 4:04 am

Web Title: sahitya akademi award
Next Stories
1 प्रचारासाठी बाजीराव पगडय़ांना मागणी
2 काँग्रेसजनच म्हणतात ‘त्या’ नेत्यांना धडा शिकवा
3 माजी सभागृह नेत्याच्या विरोधात शिवसेनेकडून भोसले
Just Now!
X