निष्काम कर्मयोग व नि:स्पृह, निर्भय जीवनाची मूल्ये ज्ञानेश्वरीमध्ये असून ती मानवी जीवनामध्ये महत्त्वाची आहेत. समाजात मानवतावादी दृष्टिकोन निर्माण करायचा असेल तर संत साहित्य आणि संत वाङ्मय हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसनमहाराज साखरे करतात. संत साहित्याचा उपयोग तो करणाऱ्यांवर अवलंबून आहे, असेही त्यांचे म्हणणे असते. ज्ञानेश्वरी अभ्यासाची गुरू-शिष्य परंपरा असलेल्या आद्य साखरेमहाराज घराण्यातील किसनमहाराज साखरे यांना राज्य शासनाच्या वतीने संत साहित्य आणि मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१७-१८ चा ज्ञानोबा – तुकाराम पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वरी, तरूण पिढी आणि संत साहित्य, लेखन या विषयांवर साखरे महाराज यांच्याशी साधलेला संवाद.

* राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काय भावना आहे?

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार

हा पुरस्कार मला जाहीर झाल्याचे ऐकून आनंद झाला. गेल्या अनेक वर्षांपासून मी संत साहित्यात काम करत आहे, शासनाला या पुरस्कारासाठी मी योग्य व्यक्ती वाटल्याने त्यांनी पुरस्कार जाहीर केला आहे.

* सध्या कोणत्या प्रकल्पावर काम सुरू आहे?

लेखनाचे काम अव्याहत सुरूच आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही ज्ञानेश्वरी प्रसार आणि ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. उत्तर प्रदेशातील साधू निश्चलदास यांच्या विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर या मूळ ग्रंथांचा अनुवाद केल्याचा फायदा ज्ञानेश्वरीचे हिंदीमध्ये भाषांतर करण्यासाठी होत असून, सध्या यावरच काम सुरू आहे. ज्ञानेश्वरीचा अनुवाद करताना अनेक संस्कृतोद्भव शब्दांची निर्मिती केली आहे. तसेच हिंदीमध्ये अनेक नवे शब्द तयार केले आहेत. यापूर्वी ‘अमृतानुभव’चा हिंदी अनुवाद केला असून ‘भाव पराग’ या छोटेखानी हिंदी पुस्तकाद्वारे ज्ञानेश्वरी साररूपाने सांगितली आहे. आता संपूर्ण ज्ञानेश्वरीचा हिंदूी अनुवाद संकल्प सिद्धीस जात असल्याने हे कार्य पूर्ण होत असल्याची कृतार्थतेची भावना आहे. या तीन खंडांमध्ये असलेले ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान अमराठी भाषकांसाठी खुले झाले आहे. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ आता देशभरातील अभ्यासकांसाठी उपलब्ध होत आहे.

* संत साहित्य आणि संत वाङ्मय याबाबत तरुण पिढीला काय सांगाल?

ज्ञानेश्वरी, अभंगगाथा या माध्यमातून मानवी जीवनावर ज्ञान, कर्म, भक्ती यांचे संस्कार होतात. हे संस्कार महत्त्वाचे आहेत. शिवाय मानवी जीवनात आचार, विचार, आहार, विहार यांना आकार देण्याचे काम या साहित्यातून होते. सातशे वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थाने जीवनाला मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. दैनंदिन व्यवहारातही ज्ञानेश्वरी लागू पडते, त्यामुळे जीवनात ज्ञानेश्वरीला मोलाचे स्थान आहे. संत साहित्य आणि संत वाङ्मय हे मानवाच्या उद्धाराचे साधन आहे. त्यामुळे तरुण पिढीने त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

* संत साहित्याचे आजच्या काळातील महत्त्व काय आहे?

संत साहित्य चिरंतन टिकणारे आहे हे सत्य आहे. त्याला काळाचे बंधन नाही. आजपर्यंत संतांनी शिकवलेला मानवतावादी दृष्टिकोन चालू काळातही लागू होणारा आहे. संतांनी कोणताही भेदाभेद न करता मानवजातीची सेवा केली. विठ्ठलरूप व्हा आणि जगाचे कल्याण करा, असा त्यांचा संदेश आजच्या काळातही लागू होतो. संतांचा हा संदेश आजही महत्त्वाचा आहे. चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी संत साहित्य आणि संतवाङ्मय हाच एकमेव पर्याय आहे.

मुलाखत –  प्रथमेश गोडबोले