‘मदत नको, व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या’

पिंपरी: करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे हजारो केशकर्तनालय चालकांचे तसेच कारागिरांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. व्यवसाय बंद असल्याने उत्पन्न नाही. जवळचे सर्व पैसे संपले आहेत. दैनंदिन गरजा पूर्ण कशा करायच्या, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. राज्यशासनाकडून आर्थिक मदत (पॅकेज) मिळण्याची शक्यता धूसर असल्याने, आम्हाला दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी या वर्गाकडून होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात असलेल्या केशनकर्तनालयांमध्ये हजारोंच्या संख्येने कामगार आहेत. बहुतांश कामगार बाहेरून आलेले आहेत. या सर्वाचे हातावर पोट आहे. दिवसभर जितके काम होईल, त्याच प्रमाणात कामगारांना पैसे मिळतात. टाळेबंदीमुळे केशकर्तनालये बंद आहेत. त्यामुळे ग्राहक येत नाहीत. परिणामी, कामगारांना पैसे मिळणे बंद झाले आहे. गेल्या वर्षी सहा ते आठ महिने अशा परिस्थितीत पूर्णपणे भरडून निघाल्यानंतर यंदा तोच अनुभव ते घेत आहेत. जवळचे पैसे संपले आहे. उसनवारी व कर्ज मिळत नाही. बाहेर पडता येत नाही. दुसरे काम जमत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. अनेकांचे जेवणाचेही हाल होत आहेत. चालक वर्गाला जागेचे भाडे, वीजबिल, पगार, साहित्य खर्च असे अनेक खर्च आहेत. दुकान बंद राहिल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत.  त्यामुळे सगळेच हवालदिल झाले आहेत. याव्यतिरिक्त, दाढी तसेच केस कापण्यासाठी नियमितपणे येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होत आहे.  अशा परिस्थितीत, दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी या व्यावसायिकांची मागणी आहे.

अनेकांचे अर्थार्जन असलेली ही आवश्यक सेवा आहे. दुकाने बंद राहिल्याने आमचे हाल होत असून ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. अन्यथा, आमचे जगणे अवघड होऊन जाईल.

– अरुण वखरे, कारागीर, सांगवी