अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणाला गुरुवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, अद्यापही याप्रकरणातील आरोपींना शिक्षा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर भैय्युजी महाराज यांनी त्या ठिकाणी स्मारक उभारले जावे, असे विधान करुन वाद ओढावून घेतला आहे. त्यांच्या या विधानाचा आज पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून निषेध नोंदवण्यात आला. भैय्युजी महारांजाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संभाजी ब्रिगेडने नाराजी व्यक्त केली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले की, कोपर्डी घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. त्या घटनेला गुरुवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र भैय्युजी महाराज त्या पीडीतेचे स्मारक उभारावे, असे विधान करतात. यातून त्यांचा बालिशपणा दिसत आहे. स्मारक हे शौर्याचे आणि पराक्रमाची आठवण करून देण्याचे प्रतिक असते. कोपर्डीत जे घडलं ते पाहून प्रत्येक व्यक्तीची मान शरमेने खाली गेली आहे. अशा प्रसंगाचे स्मारक उभारण्याचे भाष्य करुन भैय्युजी महाराज यांनी माणुसकीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. ते पुढे म्हणाले की, या पुढे जर त्यांनी असे विधान केले तर संभाजी ब्रिगेड स्टाइलने त्यांना हिसका दाखवू , असा इशाराही त्यांनी दिला.