राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षेचा सराव करता येण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) विषयनिहाय नमुना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापपर्यंत १६ विषयांचे नमुना प्रश्नसंच ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तर उर्वरित विषयांचे प्रश्नसंचही लवकरच उपलब्ध करून दिले जातील.

करोना प्रादुर्भावामुळे यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण विस्कळीत झाले. त्यामुळे परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाची चांगल्या पद्धतीने तयारी करण्यासाठी, स्वयंअध्ययन करण्यासाठी विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून नमुना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. त्यानुसार विद्या प्राधिकरणाने नमुना प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर म्हणाले, की बारावीचे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, इंग्रजी, गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य) इतिहास (मराठी, इंग्रजी), भूगोल (मराठी) या विषयांचे प्रश्नसंच, तर दहावीच्या गणित भाग एक आणि दोन, इतिहास आणि राज्यशास्त्र (मराठी) भूगोल (मराठी, इंग्रजी), कु मारभारती आदी विषयांचे प्रश्नसंच संके तस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. पुढील काही दिवसात उर्वरित विषयांचेही प्रश्नसंच दिले जातील. http://www.maa.ac.in  या संकेतस्थळावरून नमुना प्रश्नसंच डाऊनलोड करता येतील.

९४ लाखांहून अधिक भेटी…

दहावी आणि बारावीच्या प्रश्नसंचाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता असल्याचे स्पष्ट झाले. प्रश्नसंच उपलब्ध झाल्याचे जाहीर करण्यात आल्यावर विद्या प्राधिकरणाच्या संकेतस्थळ भेटींमध्ये झपाट्याने वाढ झाली. काहीच वेळात ९४ लाख १३ हजार ७६८ लोकांनी भेटी दिल्याची माहिती उपसंचालक विकास गरड यांनी दिली.