मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा झालेला अभिनेता संजय दत्तला पत्नीच्या वैद्यकीय कारणासाठी तीस दिवसाची संचित रजा (पॅरोल) विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शुक्रवारी मंजूर केली. तो ३० दिवसांची अभिवाचन रजा (फरलो) संपवून महिन्यापूर्वीच कारागृहात दाखल झाला होता. त्यानंतर लगेचच त्याला ही रजा मंजूर करण्यात आली आहे.
संजय दत्त याला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. तो मे २०१३ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला यापूर्वी अठरा महिने स्थानबद्ध करण्यात आले असल्याने तो साडेतीन वर्षे शिक्षा भोगणार आहे. त्याला यापूर्वी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या काळासाठी रजा मिळाली होती. त्यानंतर तो येरवडा कारागृहात दाखल झाला. आता त्याला महिन्यानंतर लगेचच पुन्हा दुसरी रजा मंजूर झाली आहे. त्याने संचित रजेसाठी नियमानुसार विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता.
याबाबत विभागीय आयुक्त देशमुख यांनी सांगितले की, दत्त याने संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर कारागृह प्रशासन आणि पोलीस आयुक्त कार्यालयाकडून अहवाल मागवण्यात आले होते. ते आल्यानंतर दत्त याला रजा मंजूर करण्यात आली. त्याची पत्नी मान्यता हिच्यावर शस्त्रक्रिया करायची असल्याचे कारण देण्यात आले आहे. त्यासाठी त्यासाठी त्याला ही रजा मंजूर करण्यात आली. आता ५००० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला रजेवर जाता येईल. याबाबत कारागृह प्रशासन निर्णय घेईल. दत्त याला आठवडय़ातून दोन वेळा खारघर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल.
दरम्यान, येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले की, दत्त याच्या रजेचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, त्याच्या मंजुरीचे आदेश शुकवारी रात्री पावणेआठपर्यंत मिळालेले नव्हते.