पुण्यातील कचरा प्रश्न गेली काही वर्षे सातत्याने गाजत असला तरी या प्रश्नावर 19prakriyaअद्याप प्रभावी उपाय झालेला नाही. प्रभागांमध्ये कचरा प्रक्रियेचे छोटे प्रकल्प सुरू करणे हा त्यावर उपाय असला तरी त्याबाबतीतही भरीव काम झालेले नाही. या पाश्र्वभूमीवर कोरेगाव पार्क प्रभागातील पाच कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन रविवारी होत आहे. या प्रकल्पांचे वैशिष्टय़ हे, की हे प्रकल्प स्थानिक नगरसेविका वनिता वागसकर यांच्या संकल्पनेतून पुढे आलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला आहे. हे प्रकल्प आता प्रत्यक्षात सुरू होत आहेत. एकाच प्रभागात सुरू होत असलेल्या या पाच प्रकल्पांसंबंधीची माहिती वागसकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

कचरा प्रक्रियेचा सर्वंकष विचार..

अनेक प्रकल्प एकाच प्रभागात सुरू करण्याचे कारण काय?

कचरा विल्हेवाटीची समस्या शहरात सातत्याने निर्माण होत आहे. उरुळी येथील कचरा डेपोच्या मर्यादा आता स्पष्ट झाल्या असून त्यावर उपाय म्हणून कचरा डेपोसाठी नव्या जागांचा शोध सुरू आहे. मात्र तशा जागा अद्याप महापालिकेला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे छोटे प्रकल्प सुरू झाले तर शहराचा जो एकूण कचऱ्याचा प्रश्न आहे तो सुटण्यास मदत होईल, या दृष्टिकोनातून मी आमच्या प्रभागाचा विचार केला आणि त्यातून हे प्रकल्प आता आमच्या प्रभागात सुरू होत आहेत.

या प्रकल्पांचे वैशिष्टय़ काय आहे?
प्रभागातील कचरा प्रभागातच जिरवणे ही मुख्य संकल्पना आहे. त्या दृष्टीने आमच्या कोरेगाव पार्क प्रभागाने यापूर्वीच शहराला आदर्श घालून दिला आहे. ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीचे दोन प्रकल्प आता सुरू करत आहोत. तसेच बागांमधील जो कचरा असतो तो म्हणजे पाने, झावळ्या अशा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी श्रेडर मशीन घेण्यात आले आहे. त्या कचऱ्यावर काही प्रक्रिया करून त्यापासून जळाऊ विटा तयार करण्याची यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच सॅनेटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्याची यंत्रणाही प्रभागामध्येच उभारण्यात आली आहे.

रोज किती टन कचऱ्यावर या माध्यमातून प्रक्रिया होईल?
या पाचही प्रकल्पांमध्ये मिळून दररोज तब्बल १७ टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी कनव्हेअर बेल्टची आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्या प्रभागात तीन मोठी रुग्णालये आहेत. तेथील मेडिकल वेस्ट ‘पॉस्को’ संस्थेच्या माध्यमातून गोळा केले जाते. त्यापकी बहुतांश प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित झाले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीच्या प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी केले जाणार आहे. त्यानंतर पाचही प्रकल्प कार्यान्वित होतील.

अशा विषयात नागरिकांचा सहभाग किती मिळाला?
आमच्या प्रभागातील जागरूक नागरिकांनी स्वच्छता अभियानासह सर्व उपक्रमांना चांगली साथ दिली आहे. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण स्वच्छ शहर अभियानात जी स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेत पहिल्याच वर्षी आमच्या प्रभागाने प्रथम क्रमांक मिळवला. त्या पारितोषिकाच्या रकमेतूनही आम्ही प्रभागात स्वच्छता आणि कचरा प्रक्रिया या विषयांना प्राधान्य देऊन उपक्रम राबवले. तुम्ही चांगले काम करत असाल तर नागरिकही उत्स्फूर्त प्रतिसाद देतात असा अनुभव आहे.
मुलाखत: विनायक करमरकर